शिवसेना आमदारांनी स्वतःच्याच पक्षाची प्रतिमा मलीन केली! विरोधी पक्षनेत्यांवर केलेल्या वक्तव्याचा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखेंनी केला निषेध

नायक वृत्तसेवा, राहाता
विरोधी पक्षनेतेपद हे संवैधानिक पद आहे. त्या पदावर असलेल्या व्यक्तीसंबंधी गलिच्छ वक्तव्य करून शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वत:च्या पक्षाचीच प्रतिमा मलीन केली आहे. सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आमदार गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा विखे-पाटील यांनी निषेध केला. विखे म्हणाले, ‘गायकवाड यांना पक्षाच्या प्रमुखांनी तातडीने समज देण्याची गरज होती. पण त्यांना कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून होत आहे. आघाडी सरकारमध्ये थोडी जरी चाड शिल्लक असेल तर त्यांनी त्या आमदारांवर गुन्हा दाखल करावा. आघाडी सरकारचे नेते नैतिकतेच्या गप्पा मारून केंद्र सरकारवर टीका करतात. परंतु सत्ताधारी पक्षाचे आमदार पातळी सोडून विरोधी पक्षनेत्यांवर वक्तव्ये करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. विरोधी पक्षनेतेपद संविधानिक दर्जा असलेले पद आहे. त्या पदावर असलेल्या व्यक्तीबाबत हीन दर्जाचे वक्तव्य करणार्‍या आमदारावर कारवाई करण्याची नैतिकता महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी दाखवावी,’ असे विखे-पाटील म्हणाले.

कोरोनाच्या संकटकाळात भाजप खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी काल वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला होता. भाजपसारखे राजकारण देशातच काय, जगात कुणी करत नसेल. त्यांना लाज वाटली पाहिजे. मला कोरोनाचे जंतू सापडले तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन. इतका तिरस्कार माझ्या मनात या लोकांबद्दल निर्माण झाला आहे, असं गायकवाड म्हणाले होते.

Visits: 101 Today: 1 Total: 1098641

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *