कलाभूषण खेडकरांच्या नेतृत्त्वाखाली तमाशा कलावंत करणार उपोषण! कोविड संकटातील उपासमारीकडे सरकारचे लक्ष्य वेधण्याचा करणार प्रयत्न


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाच्या भयंकर संकट काळात लोककलावंतावर उपासमारीची वेळ आलेली असतानाही राज्य सरकारने एका नव्या पैशाचीही मदत केली नसल्याने, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 21 सप्टेंबर रोजी तमाशा पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या नारायणगाव येथे महाराष्ट्रराज्य तमाशा फडमालक कलावंत उकस मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय राज्यातील लोककलावंतानी घेतला आहे.


महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांचा यावर्षीचा हंगाम निघून गेल्याने आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे एक दमडी शिल्लक नाही. चालू वर्षी सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाल्याने कोणी कार्यक्रमाला बोलावीत नाही. अशी खंत या कलावंतांची आहे. म्हणूनच यापूर्वी राज्यातील विविध संघटनांनी निवेदनाव्दारे राज्य सरकारला आर्थिक मदतीची मागणी केली होती. परंतु अद्यापही या विषयावर सरकार जागे झालेले नाही.


म्हणूनच तमाशा पंढरी अशी ओळख असणार्‍या नारायणगाव येथील तमाशा सम्राज्ञी (कै) विठाबाई नारायणगाव यांच्या स्मारकासमोर लोककलावंतांनी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिथून तमाशा घडला, अन् ज्या विठाबाईंनी आमच्या तमाशा कलावंताचे नाव जगभर पसरविले त्यांच्या गावातूनच आम्ही कलावंतांच्या मागण्यांसाठी संघर्षाचा शुभारंभ करणार आहेत असे रघुवीर खेडकर यांनी याप्रसंगी सांगितले.
(कै) विठाबाई नारायणगावकर यांचे सुपुत्र कैलाश, कन्या मालती इनामदार, नातू विशाल तसेच महाराष्ट्रराज्य तमाशा फड मालक कलावंत विकास मंडळाचे सचिव मुसाभाई इनामदार, उपाध्यक्ष राजू बागुल, दत्ता महाडिक यांचे सुपुत्र संजय महाडीक, शांताबाई संक्रापुरकर आदी लोककलावंत या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Visits: 219 Today: 1 Total: 2236538

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *