डेंग्यूची माहिती शासकीय यंत्रणेला कळविणे बंधनकारक! अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे आदेश

नायक वृत्तसेवा, नगर
सहा महिन्यांपासून अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल २२८ रुग्ण डेंग्यूच्या तापाने फणफणले आहेत. यातील दोघांना जीव गमवावा लागला. यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग चांगलाच अॅक्शन मोडवर आला असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे थेट मैदानात उतरले आहे. आता डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची माहिती संबंधित उपचार करणारे खासगी रुग्णालये आणि डेंग्यू अहवाल पॉझिटिव्ह देणार्या खासगी प्रयोगशाळा यांनी याबाबतची माहिती जवळच्या शासकीय यंत्रणेला कळवण्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत. अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सध्या गावोगाव डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे नगर शहरासह ग्रामीण भागातील दवाखाने आणि रुग्णालये खचाखच भरली आहेत. दुसरीकडे कोणत्याही तापाला डेंगीचा ताप समजले जात असल्याने चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात हिवतापासोबतच चिकुनगुणियाचेही रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांत नगर तालुक्यातील मेहेकरी व नेवाशातील सोनई या गावातील रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र, नाशिकची मृत्यू संशोधन समिती संबंधितांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांतून झाला, याची तपासणी करत आहेत. त्याच्या अहवालनानंतर तथ्य समोर येणार असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

नगर शहरात महापालिका आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग कार्यरत असून त्यांच्या जोडीला जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय आहेत. याठिकाणी साथजन्य काळात विविध उपाययोजनांसह त्या उद्भवून नयेत, यासाठी प्रचार आणि प्रसिध्द करण्यात येत आहे. मात्र, सध्या ग्रामीण भागात तापाचे रुग्ण वाढत असून त्यावर नियंत्रण उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रिक्त जागा अडसर ठरत आहे. जिल्ह्यात १ हजार ३१८ ग्रामपंचायतींसाठी अवघे ५०० आरोग्यसेवक आहेत. त्यातही त्यांना इतर कामे करावी लागतात. सुट्ट्या किंवा रजांचा विचार केल्यास त्यांना कामास फारसा वेळच मिळत नाही. ज्या गावांत बाधित रुग्ण आढळतील तेथे ग्रामपंचायतीमार्फत प्रबोधन केले जात आहे.

डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर ८७ गावांत धूरफवारणी करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले. यासह तापाच्या रुग्णाचे जानेवारीपासून रक्त नमुने घेण्यात येत आहेत. यात १ हजार २०९ संशयित डेंग्यूचे, तर हिवतापाचे ५ लाख ६४ हजार ६५३ नमुने तपासले आहेत. यात हिवताप बाधितांचे २, डेंग्यूची बाधा झालेले २२८ आणि एकाला चिकणगुणिया झाल्याचा अहवाल शासकीय आरोग्य विभागाने दिला आहे.

गुरुवारपासून जिल्ह्यात डेंंग्यूचा अहवाल पॉझिटिव्ह देणार्या प्रयोगशाळा आणि उपचार करणार्या खासगी दवाखान्यांना डेंग्यू रुग्णांची माहिती शासकीय आरोग्य संस्थांना कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील डेंग्यूची वस्तुस्थिती समोर येणार आहे.
