मुख्यमंत्र्यांविरुद्ध सोशल मीडियावर विषवमन! ‘जागो संगमनेरी’ समूहातील प्रकार; ग्रुप अ‍ॅडमीनसह दोघांवर गुन्हा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सोशल मीडियावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा संतापजनक प्रकार संगमनेरमध्ये उघडकीस आला आहे. या विकृत कृत्यामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, शहर भाजप अध्यक्षांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांविरुद्ध ‘अदखलपात्र’ गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी भाजपच्या शहराध्यक्ष पायल ताजणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज (ता.4) सकाळी त्या संगमनेरच्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधत होत्या. याच दरम्यान एका भाजप कार्यकर्त्याने त्यांना फोन करुन सोशल मीडियावरील एका ग्रुपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सुरु असलेल्या निंदनीय पोस्टबाबत माहिती दिली. संबंधित पोस्टमध्ये फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत विखारी, अपमानकारक आणि समाजात तेढ निर्माण होईल अशा भाषेचा वापर करुन एका विषयावर चर्चा करण्यात आली होती.


शहराध्यक्ष ताजणे यांनी तात्काळ सदर पोस्टचे स्क्रीनशॉट मिळवून खात्री केली असता, राजकीय द्वेषातून एका जबाबदार राष्ट्रीय नेत्याची बदनामी करण्याचे कारस्थान सुरु असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी ‘जागो संगमनेरी..’ या नावाने नेहमीच एका विशिष्ट जातीला शिव्या देणार्‍या आणि विद्यमान केंद्र व राज्य सरकारवर राजकीय हेतूने दूषीत होवून सतत काहीतरी वादग्रस्त पोस्ट प्रसिद्ध करणार्‍या समूहाचा समन्वयक (अ‍ॅडमीन) अमोल शेलकर (मोबाईल क्रं. 9881926698) आणि सदरील पोस्ट प्रसिद्ध करणार्‍या मोबाईल क्रमांक (8983471881) धारकावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 356 (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे लोकनेते आहेत. त्यांच्याबद्दल अशा प्रकारे असभ्य भाषेत लिखाण करणे ही वैचारिक दिवाळखोरी आहे. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांविरुद्ध आम्ही गप्प बसणार नाही, असा रोखठोक इशारा भाजप शहराध्यक्षा पायल ताजणे यांनी यावेळी दिला. शहर पोलिसांनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणार्‍यांच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस सायबर सेलची मदत घेत असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. राजकीय चिखलफेक करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणार्‍यांना या कारवाईमुळे मोठा दणका बसला असून, संगमनेरच्या राजकीय वर्तुळात या घटनेची मोठी चर्चा सुरु झाली आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 1771705

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *