नेवाशाला पाणी पुरवठा करणार्‍या योजनेची वीज तोडली आंदोलनकर्त्यांनी स्वतःसह महावितरणच्या अधिकार्‍यांना घेतले कोंडून


नायक वृत्तसेवा, नेवासा
शहराला पाणी पुरवठा करणार्‍या योजनेची तोडलेली वीज पुन्हा जोडून वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा. या मागणीसाठी गुरुवारी (ता.2) महावितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये ग्रामस्थांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसह शहरवासियांनी कार्यालयातच ठिय्या करताना स्व:तबरोबर अधिकार्‍यांना देखील शटर लावून कोंडून घेतले.

नगरपंचायतच्यावतीने महावितरणच्या अधिकार्‍यांना दोन लाखाचा धनादेश देण्यात आला. उर्वरित पाच लाखाची रक्कम मुदतीत भरल्या जाईल असे लेखी नगरपंचायतने महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यास दिल्यानंतर सदरची बाब वरिष्ठांना कळविली जाईल असे सांगितल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

नेवासा नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेची वीज थकीत बिलामुळे तीन दिवसांपासून तोडण्यात आली होती. त्यामुळे शहरवासियांना पाणी असूनही पुरवठा होऊ शकला नाही. ग्रामदैवत श्री मोहिनीराज भगवान यांचा पंधरा दिवसांचा यात्रौत्सव सुरु झालेला असल्याने वीज पुरवठा सुरू करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच वीज पुरवठा सुरळीत न केल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. उपविभागीय अभियंता शरद चेचर यांनी वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. पोलीस निरीक्षक विजय करे यांनी देखील फोवरून अधिकार्‍यांशी चर्चा केली. मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी पाच लाखाची रक्कम येत्या पंधरा दिवसांत भरण्याची तरतूद केली जाईल असे लेखी दिल्याने महावितरणचे अधिकारी शरद चेचर यांनी आपले म्हणणे वरिष्ठांना कळवून निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याने हे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

Visits: 86 Today: 1 Total: 1109898

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *