परखतपूर येथील महादेव मंदिरात चोरी

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील परखतपूर येथील महादेव मंदिरात गुरुवारी (ता.19) रात्रीच्या सुमारास दोन चोरट्यांनी दानपेटीवर डल्ला मारत सुमारे 50 ते 60 हजार रुपये लांबवले आहेत. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून, पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहे.

शुक्रवारी सकाळी महादेव मंदिराची पूजा करण्यासाठी व दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना चोरी झाल्याची घटना निदर्शनास आली. त्यानंतर नागरिकांनी अकोले पोलिसांशी संपर्क साधत घटनास्थळी येण्याची विनंती केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मंदिर परिसराची पाहणी करून पंचनामा केला. येथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात या चोरीचा प्रकार कैद झाला असून त्याचे चित्रीकरण पोलिसांनी तपासले आहे. यातून काही चोरटे पकडण्यास काही अंशी मदत होईल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्याकडे रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी सरपंच प्रशांत वाकचौरे, अविनाश देशमुख, भारत वाकचौरे, योगेश देशमुख, नितीन वाकचौरे, संदीप वाकचौरे, जगन वाकचौरे, सोमनाथ खांडगे यांनी केली. या घटनेचा पंचनामा हे. कॉ. के. के. पर्बत, पो. ना. पटेकर यांनी केला असून पुढील तपास मुख्य हवालदार ए. जे. घुले हे करत आहे.

Visits: 180 Today: 1 Total: 2063031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *