ऊसतोड कामगारांची सव्वीस मुले झाली शाळेत दाखल! आधार फाउंडेशनकडून दप्तरासह शैक्षणिक साहित्याची भेट
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पोटाची खळगी भरण्यासाठी चाळीसगाव येथून काही कुटुंबांचे स्थलांतर होऊन ते ऊसतोडणी कामासाठी संगमनेर तालुक्यातील समनापूर परिसरात आले आहेत. ऊसतोडणी कामगारांच्या या झोपड्यांवरील २६ मुलांचे प्रवेश समनापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून, त्यांना आधार फाउंडेशनतर्फे शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. त्यामुळे मुलांचे चेहरे खुलल्याचे आनंददायी चित्र पाहायला मिळाले.
या विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमला गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र भालारे, दीपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख आशा घुले, नंदा वलवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष खेमनर, आधारचे समन्वयक विठ्ठल कडूसकर, मुख्याध्यापिका राजश्री कर्पे, एकनाथ साबळे, सुनील झावरे आदिंसह पालक वर्ग उपस्थित होता. दरम्यान, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे स्वागतगीताने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते एक वही, पेन व गुलाबपुष्प देऊन मुलांना सन्मानित करण्यात आले. मुलांचे चेहरे खुललेले दिसून आले.
कुटुंबाच्या आर्थिक अडचणीमुळे काही कुटुंबे वेगवेगळ्या कामानिमित्त स्थलांतर करतात. यावेळी मुलंबाळही आपल्यासोबतच घेऊन जात असतात. त्यामुळे ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांना नजीकच्या शाळेत दाखल करण्याचे आवाहन ऊसतोडणी कामगारांना अध्यक्षस्थानावरून गटशिक्षणाधिकारी गुंड यांनी केले. शाळाबाह्य सर्वेक्षण व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वैभव जोशी, नामदेव वाडेकर, सुनीता जोंधळे, किरण खैरनार, आफ्रिनबानो शेख, मतीन शेख, मनीषा शिंदे, योगिता गोफणे आदिंनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका कर्पे यांनीकेले, सूत्रसंचालन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज कवडे यांनी केले.