गुंजाळवाडीत ‘ड्रोन’च्या घिरट्या सुरुच! ग्रामस्थांनी केला पाठलाग; पोलिसांचे मात्र धक्कादायक उत्तर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दित चोर्‍या, गंठण आणि मोटर सायकल लांबविण्याच्या घटनांची श्रृंखला कायम असतानाच आता शहरालगतच्या उपनगरांमध्ये रात्रीच्या ‘ड्रोन’मुळे नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत. याबाबत वेळोवेळी यंत्रणांकडे दाद मागूनही कोणतीही मदत मिळत नसल्याने उपनगरांमध्ये राहणारे रहिवाशी हवालदील झाले आहेत. शनिवारी रात्रीही शहराला अगदी लागूनच असलेल्या गुंजाळवाडी शिवारात उडणार्‍या ड्रोनने ग्रामस्थांचे लक्ष वेधले. त्यामुळे जवळपास शंभर जणांनी ड्रोन चालवणार्‍याचा मागमूस काढीत पोलिसांना त्याबाबतची माहिती दिली. मात्र मदत देण्याऐवजी संबंधित अंमलदाराने पोलीस ठाण्याचे वाहन नादुरुस्त असल्याचे धक्कादायक उत्तर दिल्याने दृष्टीत असलेले चोरटे ड्रोनसह पसिरातील एका कामगाराची दुचाकी घेवून पसार होण्यात यशस्वी ठरले. या प्रकाराने गुंजाळवाडीकर संतप्त झाले आहेत.


याबाबत गुंजाळवाडीतील प्रत्यक्षदर्शी असलेल्या ग्रामस्थांकडून समजलेल्या माहितीनुसार गेल्याकाही दिवसांपासून गुंजाळवाडीसह आसपासच्या परिसरात रात्रीच्यावेळी अज्ञाताकडून ड्रोन उडवले जात आहेत. विशेष म्हणजे ड्रोनच्या उड्डाणावेळी संपूर्ण परिसरात कोठेही कोणताच कार्यक्रम अथवा समारंभ सुरु नसल्याने अनेकांच्या मनात शंका निर्माण झाल्या. त्यातच अशाप्रकारे ड्रोनद्वारे रेकी करुन पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये चोरीच्या घटना घडल्याचेही समोर आल्याने रात्री उडणारे ड्रोन चोरट्यांचेच असतात असे ग्रामस्थांचे मत तयार होवून त्यातून संपूर्ण परिसरात दहशत निर्माण झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गुंजाळवाडीतील काही प्रतिष्ठीतांनी पोलिसांनाही या अज्ञात ‘ड्रोन’चा शोध घेण्याचे साकडे घातले, मात्र आजवर त्यांना त्यातून दिलासा मिळाला नाही.


सध्या सर्वत्र नवरात्रौत्सवाची धूम सुरु असून अनेक ठिकाणी रात्रीच्यावेळी दांडीयाचे कार्यक्रमही सुरु आहेत. अशावेळी रात्री उशिरापर्यंत रस्त्यांवर वर्दळ असतानाही गुंजाळवाडीत शनिवारी (ता.5) रात्री आकाशात ड्रोन फिरत असल्याचे चित्र दिसून आले. त्यावेळी गुंजाळवाडीतील महादेव मंदिरात मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकवटलेले असल्याने त्यांनी ड्रोन उडवणार्‍याचा शोध घेण्याचा चंग बांधून अंदाज घेण्यास सुरुवात केली. मात्र ड्रोन उडवणार्‍यांना मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र होवून आपल्याच दिशेने येत असल्याचे चित्र आधीच दिसल्याने ऊसाच्या आडोशाला लपून रेकी करणार्‍या चोरट्यांनी ड्रोन खाली घेण्यास सुरुवात केली.


त्यामुळे चोरटे नेमके कोणत्या दिशेला लपलेले असावेत याचा अंदाज आल्याने जवळपास शंभरावर ग्रामस्थांनी त्या दिशेला धाव घेतली. तो पर्यंत आपण आता पकडले जाणार याची खात्री झाल्याने चोरट्यांनी घाईघाईत ड्रोन खाली उतरवून तेथून पलायन केले. ग्रामस्थांकडून चोरट्यांचा माग काढला जात असतानाच त्यातील एकाने 112 क्रमांकावर फोन करुन घटनेची माहिती देत मदत मागितली. तर, अन्य एकाने शहर पोलीस ठाण्यात फोन करुन ताबडतोब पोलीस पाठवा अशी विनवणी केली. त्यावर लोकसेवेत असलेल्या पोलिसांकडून घाबरलेल्या ग्रामस्थांना दिलासादायक उत्तर मिळण्याची अपेक्षा असताना संबंधित ठाणे अंमलदाराने ‘पोलिसांचे वाहन नादुरुस्त असल्याने कर्मचारी पाठवणे अशक्य आहे’ असे अजब उत्तर देवून आपली जबाबदारी झटकली.


तो पर्यंत गुंजाळवाडीकर पाठलाग करीत जेथे ड्रोन खाली आला होता त्या ठिकाणावर पोहोचले. मात्र त्यांच्या आगमनापूर्वीच चोरट्यांचे पलायन झाल्याने ते ऊसाच्या क्षेत्रात दडले असतील असे समजून ग्रामस्थांनी काठ्या-लाठ्यांसह बॅटरीच्या उजेडात संपूर्ण ऊसाचे क्षेत्र पिंजून काढले. मात्र चोरट्यांनी ऊसात न लपता ग्रामस्थ येण्यापूर्वीच तेथून पळ काढीत जवळच राहणार्‍या एका गरीब कामगाराची दारात उभी असलेले बजाज प्लॅटिना ही दुचाकी घेवून तेथून पोबारा केला होता. सदरचा प्रकारही त्याचवेळी लक्षात आला, मात्र पोलिसांची मदतच न मिळाल्याने दृष्टीक्षेपात येवूनही ग्रामस्थांच्या डोळ्यादेखत ‘ड्रोन’द्वारे टेहळणी करुन पद्धतशीर चोर्‍या करणारे चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.


या घटनेने संगमनेर शहरालगतच्या उपनगरांमध्ये रात्रीच्यावेळी उडणारे ड्रोन चोरट्यांचेच असल्याचेही आता स्पष्ट झाल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी या घटनांची गांभीर्याने दखल घेवून रात्रीच्यावेळी गस्त वाढवण्यासह अशाप्रकारे ड्रोनद्वारे रेकी करणार्‍यांचा शोध घेवून भयभीत नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.


गेल्या अनेक दशकांपासून शहराची हद्दवाढ खुंटल्याने शहरालगतच्या गुंजाळवाडी, घुलेवाडी, वेल्हाळे, कासारा दुमाला, सुकेवाडी, कुरण या ग्रामपंचायत क्षेत्रात दररोज रहिवाशी वसाहतींच्या संख्येत वाढ होत आहे. शहराला अगदीच लागून असलेल्या एकट्या गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दित राहणार्‍या नागरिकांची एकूण संख्या आजच्या स्थितीत 35 हजारांहून अधिक आहे. मात्र त्या तुलनेत या वाढीव वसाहतींना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यातच आता ड्रोनद्वारे रेकी करुन चोरटे सावज हेरुन डाव साधू लागल्याने उपनगरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे.

 

Visits: 217 Today: 3 Total: 1100449

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *