चितळीमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
चितळी येथे एका चौदावर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने श्रीरामपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या मुलीचा घातपात झाला असावा, असा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

चितळी गाव परिसरात राहणार्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताचा श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेह ताब्यात घेत श्रीरामपूरला शवविच्छेदनासाठी पाठविला. सदर मुलीचा मृत्यू कशामुळे झाला? याविषयी माहिती मिळू शकली नाही. परिसरातील नागरिक व नातेवाईकांनी गावातील दोन जणांची नावे पोलिसांना सांगितली आहेत. घटनेनंतर ते दोघे पसार झाल्याचे नागरिक सांगत आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा घातपात झाला असल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्याने तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाऐवजी नगरच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या घटनेचा उलगडा होईल. तिच्यावर अत्याचार करुन तिचा घातपात करणार्यांविरुध्द कारवाई करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
