कोदणी वीज प्रकल्पात अजूनही बिबट्या ठाण मांडून…
कोदणी वीज प्रकल्पात अजूनही बिबट्या ठाण मांडून…
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कोदणी येथील वीज केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ चक्क बिबट्या रखवालदार बनल्याने तेथील कर्मचार्यांची चांगलीच फजिती झाली आहे. चक्क महिना उलटून गेला तरी बिबट्या मादी वीज प्रकल्पात ठाण मांडून आहे.

वन विभागाने प्रवेशद्वार उघडे ठेवण्यास सांगितले. परंतु काहीच उपयोग झाला नाही, वन विभागाने प्रवेशद्वाराजवळ शेती ठेवून पिंजरा लावूनही हा बिबट्या तिच्याकडे ढुंकून पाहत नाही. आता तर बिबट्या मादी थेट कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर येऊन बसू लागल्याने कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. या कर्मचार्यांना ना आत जाता येईना ना बाहेर पडता येईना; आतले लोक आत बाहेरचे लोक बाहेर तर काही कर्मचारी भीतीपोटी रजेवर जाण्याच्या मानसिकतेत आहे. एवढा प्रकार घडलेला असताना वनविभाग मात्र निवांत आहे. वनविभागाच्या कामचुकारपणामुळे कोदणी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी येथे येऊनही काहीही उपयोग झाला नाही. बिबट्या जोपर्यंत नुकसान करत नाही, तोपर्यंत वनविभाग निर्णय घेणार नाही असेच यावरुन दिसत आहे.

