बांगरवाडीतील मायलेकी ठरल्या शासकीय अनास्थेच्या बळी! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पडक्या घरकुलात कंठताहेत जीवन
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील बांगरवाडी येथील एकशे दोन वर्षांच्या राहीबाई किसन भांगरे व पंच्च्याहत्तर वर्षीय सीताबाई कोंडिबा सुपे या निराधार सावत्र मायलेकी सध्या एकमेकींचा आधार बनल्या आहेत. शासकीय कार्यालयातील अनास्थेने दोघींना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे पडक्या घरकुलात प्रतिकूल परिस्थितीत या मायलेकी जीवन कंठत आहेत.
राहीबाई यांचे कौठवाडी (बांगरवाडी) येथील किसन भांगरे यांच्याशी लग्न झाले. मूल होत नसल्याने पतीने दुसरे लग्न केले. भांगरे यांना दुसर्या पत्नीपासून सीताबाई ही मुलगी झाली. तिचीही कहानी काहीशी राहीबाईंसारखीच. त्यामुळे ती आपल्या सावत्र आईकडे येऊन राहत आहे. दिवसभर मजुरीला जायचे. त्यातून मिळालेल्या चार पैशांतून उपजीविका चालवायची, असा मायलेकींचा दिनक्रम असायचा. राहीबाईंना टपाल कार्यालयातून निवृत्तीवेतन मिळत होते. मात्र, नातवांनी तिचा अंगठा घेऊन पैसे काढून नेले. आज या मायलेकी एकाकी पडल्या आहेत. बँकेत खाते उघडता येईना, कारण वैद्यकीय प्रमाणपत्र नाही. बँकेतील साहेब म्हणतो, राहीबाईंचा वैद्यकीय अहवाल द्या. डॉक्टर म्हणतात, त्यांना रुग्णालयात आणा, अशी कैफीयत सीताबाईंनी मांडली. राहीबाईंना रुग्णालयात नेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश भांगरे यांनी पुढाकार घेतला.
मात्र, त्यांना वाहनात बसता येईना. तलाठी, ग्रामसेवक दाद देईनात. त्यामुळे तहसीलदारांनी दखल घेऊन यावर तोडगा काढावा, अशी मागणी सीताबाईंनी यांनी केली. सरकारी कार्यालयांतील अनास्थेमुळे किती राहीबाई व सीताबाईंना वंचितांचे जीवन जगावे लागत असेल, याचे हे प्रातिनिधीक उदाहरण आहे.
राहीबाई भांगरे व त्यांची सावत्र मुलगी सीताबाई वंचितांचे जीवन जगत आहेत. त्यांना कुणाचाही आधार नाही. निराधारांसाठी सरकारच्या विविध योजना आहेत. मात्र, अद्याप या मायलेकींना अशा एकाही योजनेचा लाभ मिळालेला नाही. प्रशासनाने योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवन सुकर करावे.
– सुरेश भांगरे (उपसरपंच, कौठवाडी)