भंडारदर्याचा पाणीसाठा अठ्ठावीस टक्क्यांवर! जोर मंदावला संततधार सुरु; मुळा खोर्यातही तुफान जलवृष्टी..
नायक वृत्तसेवा, अकोले
पावसाचे आगार समजल्या जाणार्या पाणलोट क्षेत्रालाच महिनाभर हुलकावणी देणार्या मान्सूनने गेल्या तीन दिवसांतच धरणांचा नूर पालटला आहे. मुळा आणि भंडारदरा या दोन्ही धरणांच्या विस्तीर्ण पाणलोट क्षेत्रात मान्सूनने दमदार पुनरागमन केले असून महिन्याभराच्या कमी-अधिक पावसाने एकट्या भंडारदरा धरणात अडीच हजार दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे. तर मुळा खोर्यात काहीशा उशिराने दाखल झालेल्या मान्सूनचा जोर वाढल्याने अवघ्या चोवीस तासांत धरणात 474 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे. पाणलोटात शनिवारपासून कोसळणार्या पावसाचा जोर रविवारी उत्तरात्रीत मात्र ओसरला असून अधुनमधून जोरदार आषाढसरी कोसळत आहेत. त्यामुळे परिसरातील ओढ्या-नाल्यांना आवेश चढला असून भातखाचरेही तुडूंब भरुन वाहू लागली आहे. सलगच्या पावसाने भंडारदर्याचा परिसर निसर्गसौंदर्याने बहरला असून पर्यटकांची गर्दीही वाढू लागली आहे.
यंदा राज्यात वेळेवर मान्सूनचे आगमन होवूनही जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाला मात्र त्याची प्रदीर्घ प्रतिक्षा करावी लागली. जूनचा संपूर्ण महिना रुसलेल्या पावसाचे गेल्या शुक्रवारी (ता.5) पाणलोटात जोरदार पुनरागमन झाले. भंडारदर्याच्या पाणलोटातील घाटघर, रतनवाडी, पांजरे, उडदावणे अशा सर्वदूर गेल्या चार दिवसांपासून तुफान जलवृष्टी होत असल्याने खपाटीला गेलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढत असून गेल्या 48 तासांत धरणात नव्याने 769 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे धरणातील एकूण पाणीसाठा आता 27.51 टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाच्या विद्युत गृह क्रमांक दोनमधून सध्या वीज निर्मितीही सुरु असल्याने त्यासाठी अडीच हजार क्सूसेक पाण्याचा प्रवाह सोडण्यात आला आहे.
संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगाव व सिन्नर तालुक्यातील दुष्काळी भागांसाठी वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या पाणलोटातील स्थितीही समाधानकारक असून कळसूबाईच्या शिखररांगांवर आषाढसरींचा फेर कायम असल्याने वाकी जलाशयाच्या भिंतीवरुन वाहणारा प्रवाह टिकून आहे. त्यामुळे निळवंड्याचा पाणीसाठाही हलता असून 24 तासांत या धरणाच्या पाणीसाठ्यात 71 दशलक्ष घनफूटाची भर पडून एकूण पाणीसाठा 11.36 टक्के झाला आहे.
एरव्ही हंगामात रौद्ररुप धारण करुन कोसळणार्या वरुणराजाचे यंदा मुळा खोर्यात उशिराने आगमन झाल्याने मुळा धरणातील पाणीसाठा भर पावसाळ्यात उणे होत होता. मात्र आता भंडारदरा, निळवंड्यासह मुळा खोर्यातील हरिश्चंद्रगड, पेठेचीवाडी, पाचनई, कोथळे, आंबित, शिरपूंजे, कुमशेत, खडकी अशा सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे मुळा नदीवरील छोटे-मोठे पाटबंधारे प्रकल्प ओसंडून मुळा नदीही वाहती झाली असून चालू हंगामात मुळा धरणात आत्तापर्यंत 807 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले असून त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे 474 दशलक्ष घनफूट पाणी गेल्या अवघ्या चोवीस तासांतच धरणात स्थिरावले आहे.
आढळा खोर्यातील पावसाचे प्रमाण मात्र जेमतेम आहे. गेल्यावर्षी पाटबंधारे विभागाच्या अचुक नियोजनामूळे या धरणातील पाणीसाठा शिल्लक राहिला होता. त्यामुळे एकीकडे समाधानाचे वातावरण असताना दुसरीकडे महिन्याभराच्या कमी-अधिक पावसाने या धरणात आत्तापर्यंत 75 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे. आढळेवरील धरणांच्या साखळीत सांगवी व पाडोशी हे दोन लघुपाटबंधारे प्रकल्प असून ही दोन्ही जलाशये तुडूंब झाल्यानंतरच आढळा धरणात जलदगतीने पाण्याची वाढ होते. तूर्त या दोन्ही प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा असून गेल्या चोवीस तासांतील किरकोळ पावसाने धरणात नऊ दशलक्ष घनफूट पाणी दाखल होवून एकूण पाणीसाठा 41.42 टक्क्यांवर गेला आहे.
एकंदरीत जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा, भंडारदरा व निळवंडे या जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोटात आषाढाच्या आगमनासह पावसाचेही जोरदार पुनरागमन झाल्याने पाणलोटक्षेत्रासह लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकसारख्या पावसामुळे सह्याद्रीच्या कडेकपारीतून जलप्रपात कोसळू लागले असून ओढ्या-नाल्यांनाही आवेश चढला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील निसर्गसौंदर्य बहरले असून भंडारदर्याकडे पर्यटकांची पावलंही वळू लागली आहेत. त्यामुळे शेंडी परिसरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये समाधान पसरले आहे.
सावधान!
गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील भुशी धरणाच्या परिसरातील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये सहाजणांचा तर भंडारदर्याच्या जलसाठ्यात बुडून एकाचा बळी गेला आहे. भंडारदरा व मुळा धरणाच्या पाणलोटातही अशीच धोकादायक ठिकाणं असून उत्साही पर्यटकांनी अततायीपणा टाळून काळजी घेण्याची गरज आहे. पाणलोट क्षेत्रात एकसारखा पाऊस कोसळत असल्याने डोंगरांच्या कडा अतिशय निसरड्या झालेल्या असतात, त्यामुळे छायाचित्र घेण्यासाठी अथवा रिल तयार करण्याच्या मोहापायी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता असते. पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी नाहक धाडस दाखवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.