धांदरफळ येथे किरकोळ वादातून तरुण मजुराचा खून तालुका पोलिसांत वाढीव कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथून संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे मजुरीसाठी गेलेल्या मजुराचा धारधार हत्याराने भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अगदी किरकोळ कारणातून दोघा तरुणांमध्ये वाद होऊन एकाने दुसर्‍यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धारधार हत्यार पोटात भोकसले होते. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शुक्रवार दि. 11 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजता भीमा बाजीराव डोके व अजय मलखान तामचीकर यांच्यात किरकोळ वाद झाले होते. त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची सुरू असताना काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. याचे रुपांतर आणखी तीव्र वादात होऊन थेट एकमेकांना भिडण्यात झाले. यावेळी तामचीकर याने डोके यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. याचवेळी तामचीकर याने त्याच्याकडे असणारे धारधार शस्त्र काढून डोके याच्या पोटात खुपसले. यामध्ये डोके हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर तात्काळ उपचारार्थ नाशिक येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान सोमवारी (ता.14) अखेर त्याचा मृत्यू झाला आहे.

तत्पूर्वी हाणामारी झाल्यानंतर दिलीप बाजीराव डोके (मयत तरुणाचा भाऊ) यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मृत्यू झाल्यानंतर न्यायालयाची परवानगी घेऊन त्यात वाढीव कलम 302 लावण्यात आले. याबाबत शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी मयताच्या पोटाला धारदार हत्याराचा तीव्र घाव लागल्याने आतील आतड्यांना गंभीर जखमा होऊन मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. त्यावरुन पोलिसांनी वाढीव कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे करीत आहे.

Visits: 121 Today: 1 Total: 1105114

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *