माळवाडगावच्या जिद्दी शेतकर्याने पडलेला ऊस केला उभा
माळवाडगावच्या जिद्दी शेतकर्याने पडलेला ऊस केला उभा
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने श्रीरामपूर तालुक्यातील पुर्व परिसरात जोरदार हजेरी लावली. या पावसाने मुठेवाडगाव, माळवाडगाव शिवारातील ऊस पिके पडल्याने नुकसान झाले आहे. पडलेली ऊस पिके पुन्हा उभी राहणे शक्य नाही. परंतु तालुक्यातील माळवाडगाव येथील शेतकर्याने अफाट मेहनत घेऊन एक हेक्टर झोपलेला ऊस ऊठवून नायलॉन दोरीने भोळ्या बांधून उभा केला आहे.
![]()
सोन्याबापू पाटीलबा चव्हाण असे या शेतकर्याचे नाव असून त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने पाच दिवसांत चक्क एक हेक्टर झोपलेला ऊस उठवून उभा केला आहे. अवजड असलेल्या उसास उभे करणे शक्य नाही. पुन्हा पडला तर ते सर्व माहिती असूनही म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार या म्हणीप्रमाणे असेही नुकसान होणार आहे. मग उभे करण्याचा प्रयत्न करण्यास काय हरकत आहे. मग सोन्याबापू चव्हाण यांनी कुटुंबातील पत्नी, दोन मुले, सून यांच्या मदतीने पाच दिवसांत गट क्रमांक दोनमधील एक हेक्टर (2.5 एकर) ऊस नायलॉन दोरीने भोळ्या बांधून उभा केला. शेतकरी चव्हाण यांनी अगोदर स्वतः पुढे होत साप, विंचू, मधमाशी यांची काळजी घेत हे उद्दिष्ट पूर्ण केलं. अजून ऊस तोडणीस 5 महिन्यांचा कालावधी जाणार असल्याने पडलेल्या उसाचे खूपचं वजन घटून नुकसान झाले असते. त्यामुळेच हा निर्णय घेतला असल्याने त्यांनी सांगितले.

