संगमनेरच्या पूर्वभागात मध्यरात्री दोन गटात सशस्त्र दंगल! परस्पर विरोधी तक्रारीवरुन विस जणांवर गुन्हा दाखल; सात गंभीर जखमी तर पाच जणांना अटक..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
मध्यरात्रीच्या सुमारास कायद्याची बंधनं झुगारुन सुरु असलेला धुडगूस सौम्य करावा यासाठी विनवणी करण्यासाठी गेलेल्यांवरच जीवघेणा हल्ला चढवण्याचा प्रकार शहरातील नाटकीनाला परिसरातील इस्लामपूर्यात घडला. या घटनेत दोन्ही बाजूंकडून हत्यारांचा मुक्त वापर झाल्याने नऊ जणांना अत्यवस्थ अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. शहर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन दोन्ही बाजूच्या 20 जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्या पाचही जणांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नाटकीनाला परिसरातील इस्लामपूरा भागात सदरची घटना घडली. यातील फिर्यादी अमजद दाऊद सय्यद (वय 41) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार इस्लामपूरा भागात हुजेब बागवान या तरुणाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी फिर्यादीचा मुलगा सोहेल व इतर माणसं होती, त्यांच्यात मोठमोठ्याने÷आरडाओरड सुरु असल्याने फिर्यादी व त्यांचा भाऊ इब्राम दाऊद सय्यद (वय 32) हे दोघे त्यांना गोंधळ कमी करण्याबाबत समजावून सांगत असतांना दहा ते बारा जणांच्या जमावाने लोखंडी रॉड, लाकडी दांडके व हॉकीस्टीक घेवून त्यांच्यावर हल्ला चढवला. यात फिर्यादीचे नातेवाईक मध्ये पडले असता त्यांनाही बेदाम मारहाण करण्यात करण्यात आली.
या हल्ल्यात फिर्यादी अमजद सय्यद याच्यासह इब्राम सय्यद, एजाज सय्यद व सोहेल सय्यद हे चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी रुग्णालयात जावून फिर्यादीचा जवाब नोंदविला असून त्यावरुन जमीर शेख उर्फ पिंट्या अजीज शेख (वय 38), फैजान समीर शेख (वय 21), अदनान समीर शेख (वय 20), निसार अस्लम शेख (वय 50), मुन्ना शेख, गुड्डू निसार शेख, असिम शेख, अरबाज शेख, हुजेब बागवान, तस्लिम शेख व राजू शेख या अकरा जणांवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भा.द.वी. कलम 307 सह दंगल करणे, शिवीगाळ व गोंधळ करुन मारहाण केल्याचे कलम 143, 147, 148, 149, 323, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून यातील पहिल्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयासमोर उभे केले असता 6 जुलैपर्यंत (चार दिवस) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेच्या दुसर्या अध्यायात हुजेब एजाज शेख याने दुसर्या गटाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार फिर्यादीच्या वाढदिवसानिमित्ताने शहेराज निसार शेख, अरबाज निसार शेख, अदनान समीर शेख, फैजान समीर शेख असे सगळे मिळून केक कापीत असतांना आठ दहा जणांच्या जमावाने त्या सर्वांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रासह लाकडी फळीने बेदम मारहाण केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी साहिल अमजद सय्यद, मजाज दाऊद सय्यद, अमजद दाऊद सय्यद, एजाज दाऊद सय्यद, बुब्बु दाऊद सय्यद, समीर अन्सार सय्यद, इरफान दाऊद सय्यद, परवीर अमजद सय्यद व रुक्सार एजाज सय्यद (सर्व रा.इस्लामपूरा, नाटकीनाला) अशा नऊ जणांवर वरीलप्रमाणे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील पहिले पाच आरोपी रुग्णालयात दाखल असून उर्वरीत चारजण पसार झाले आहेत. या घटनेने मध्यरात्री रात्रीच्या सुमारास कुरणरोड, नाटकीनाला व भूमी अभिलेख कार्यालयाच्या परिसरात काहीकाळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मध्यरात्रीच आरोपींच्या अटकेसाठी धरपकड सुरु झाल्याने वातावरणातील तणाव निवळला. यातील पहिल्या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे तर दुसर्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
नाटकीनाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन निर्माण झालेल्या इस्लामपूर्यात झोपड्यांच्या संख्येसोबतच गुन्हेगारी प्रवृत्तींचाही मोठ्या वेगाने शिरकाव होत आहे. या परिसरात शहरात घडणार्या अनेक प्रकरणांसह जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यातील संशयीत आरोपींचा वावर असल्याच्याही चर्चा यापूर्वी अनेकवेळा समोर आल्या आहेत. आता मध्यरात्री दोन गटात घडलेल्या सशस्त्र दंगलीत दोन्ही बाजूच्या नऊ जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. अशा घटना या परिसरात नेहमीच्या आहेत, या धटनेत मात्र हत्यारांचा वापर झाला असे स्थानिक लोक सांगतात. पोलिसांनी या घटनेच्या निमित्ताने या परिसरात रुजू पाहणारी मूळे उखडून फेकण्याची गरज आहे. अन्यथ रोजच्या घटनेप्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपींपर्यंतच हा विषय मार्गस्थ होणार.