घोडेगावात विहिरीत पडून युवकाचा मृत्यू नाथपंथी डवरी समाजाचा सोनई पोलीस ठाण्यावर मोर्चा

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील घोडेगाव येथील युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. याप्रकरणी विहीर मालकावर गुन्हा दाखल करावा, यासाठी नाथपंथी डवरी समाजातील दोनशे जणांनी बुधवारी (ता.16) सोनई पोलीस ठाण्यावर मोर्चा आणून ठिय्या अंदोलन केले. चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मृतदेह ताब्यात घेवून अंत्यसंस्कार करण्यात आला.
![]()
घोडेगाव शिवारात अशोक नहार यांचे शेत असून विहिरीतील विद्युत पंप बाहेर काढण्यासाठी शिवाजी एकनाथ सावंत (वय 26) उतरला असता पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. सहाय्यक पालीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व पथकाने भेट देवून पंचनामा केला. याबाबत सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

उत्तरीय तपासणी होवूनही मृतदेह ताब्यात न घेता सर्वांनी विहीर मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मंगळवारी रात्री केली. गुन्हा दाखल न केल्याने बुधवारी (ता.16) सकाळी नाथपंथी समाज संघटनेचे भाऊराव शेगर, पिराजी शिंदे, दया सावंत, शिवराम सावंत, अनिल शेगर, मोहन शेगरसह दोनशेहून अधिक समाज बांधवांनी सोनई पोलीस ठाण्यावर मोर्चा आणून ठिय्या अंदोलन केले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. येथील वातावरण काहीवेळ तणावपूर्ण झाले होते. अखेर पोलिसांनी अशोक, अजय, अभय नहार व त्यांच्या एका कामगारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. यानंतर सर्वांनी आंदोलन मागे घेवून मृतदेह ताब्यात घेतला. तब्बल 28 तासानंतर घोडेगावात अंत्यसंस्कार करण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात हे करत आहे.

घटनेची पाहणी केल्यानंतर सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला. नातेवाईक द्विधा मनःस्थितीत होते. फिर्यादीनंतर लगेचच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
– रामचंद्र कर्पे (सहाय्यक पोलीस निरीक्षक)

विहिरीत बुडून मृत्यूमुखी पडलेल्या शिवाजी सावंतची परिस्थिती खूपच गरीबीची आहे. वृद्ध आई, वडील व तीन लहान मुले निराधार झाले आहेत. कुटुंबाचा आधार तुटल्याने सर्व समाजाने एकत्र येवून न्याय मागितला आहे.
– भाऊराव शेगर (सदस्य, नाथपंथी संघटना)
