मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांच्यावर प्राणघातक हल्ला ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हल्ला; हल्लेखोर पसार


नायक वृत्तसेवा, राहाता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांच्यावर गुरुवारी (ता.15) रात्री काही युवकांनी प्राणघातक हल्ला केला. दरवेळेस तुमच्या घरातील व्यक्ती उमेदवारी करते आणि दरवेळेस तुम्हीच निवडून येतात. बापाची ठेव आहे का? असे म्हणत लुटे यांच्या डोक्यात टणक वस्तूसह धारदार शस्राने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्ल्यात लुटे यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शिर्डी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिर्डीजवळील राहाता तालुक्यातील साकुरी गावात ही घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हल्लेखोर साकुरी गावातीलच रहिवासी आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी युवक फरार झाला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. राहता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपासून आरोपी आशिष अशोक पारखे आणि मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लुटे यांच्यात अनेकदा वाद होत होते. राजेश लुटे हे साकुरी ग्रामपंचायतीचे सदस्य होते. प्रभागात असलेल्या समस्यांविषयी आरोपी आशिष पारखे आणि लुटे यांच्यात समाज माध्यमांवर नेहमीच वाद होत होते. त्यानंतर गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका हॉटेलजवळ राजेश लुटे उभे असताना आरोपी आशिष पारखे हा त्याच्या दोन साथीदारांसह घटनास्थळी आला. यावेळी त्याने पाठीमागून लुटे यांच्यावर चाकूने हल्ला केला.
हल्ल्याच्या या घटनेनंतर साकुरी गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. तर स्थानिकांनी लुटे यांना रुग्णालयात दखल केले. राजेश लुटे यांच्या मातोश्री शकुंतला नामदेव लुटे या साकुरी ग्रामपंचायत सदस्य होत्या. राजेश यांचे बंधू संदीप नामदेव लुटे हे लोकसेवा ग्रामविकास मंडळाचे सध्या उमेदवार आहेत. यंदा साकुरी गावात दोन्ही पॅनल महसूल मंत्री विखे पाटील यांच्या गटाचे आहेत.


पल्लवी हॉटेलजवळ काल उभा होतो. फोनवर बोलत असताना आशिष पारखे नावाचा व्यक्ती तिथे आला. तो आला आणि त्याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. साकुरीमध्ये मागच्या वेळेस तुमच्या घरातील दोन सदस्य निवडून आले. साकुरी तुमच्या बापाची आहे का? पुन्हा निवडणुकीत भावाला उभं केलंय. वातावरण तयार करताय का? असं म्हणला. यावेळी बाचाबाची झाली. आणि तो तिथून निघून गेला. नंतर पाच मिनिटांनी मी फोनवर बोलत असताना हातात चाकू घेऊन तो पाठीमागून धावत आला. आणि माझ्या डोक्यात वार केले. त्यानंतर तिसरा वार गळ्यावर करायला गेला. पण मी तो वाचवला आणि तो खांद्यावर लागला. यात मी पूर्ण रक्तबंबाळ झाल्याने तो शिव्या देत निघून गेला. आणि काही लोकांनी मला दवाखान्यात दाखल केलं. यापूर्वीही मला धमकी दिली गेली होती. पोलिसांना त्याची माहिती दिली होती. या हल्ल्यामागे कोण आहे? याचा पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी राजेश लुटे यांनी केली आहे.

Visits: 6 Today: 2 Total: 29274

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *