ब्राह्मण समाजाचे विचार व्यापक आणि सर्वसमावेशक ः प्रा.कुलकर्णी पुरोहित प्रतिष्ठान आयोजित भगवान परशुराम जयंती ऑनलाईन साजरी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘ब्राह्मण समाजाचे विचार अत्यंत व्यापक आणि सर्वसमावेशक आहेत. स्वतःसाठी काहीही न मागता सर्व देशबांधवांसाठी झटत राहणे ही ब्राह्मण समाजाची भूमिका राहिली आहे’, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी आमदार प्रा.मेधा कुलकर्णी यांनी केले.

पुरोहित प्रतिष्ठान संगमनेरच्यावतीने 14 मे रोजी अक्षयतृतीयेच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या ब्रह्मर्षी भगवान परशुराम जयंतीच्या ऑनलाईन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना प्रा.कुलकर्णी यांनी वरील मत मांडले. यावेळी पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ जाखडी, उपाध्यक्ष संदीप वैद्य, अरुण कुलकर्णी, विशाल जाखडी, सागर काळे, प्रतीक जोशी, वसंत कुलकर्णी यांच्यासह अनेक ज्ञातिबांधव तसेच इतरही अनेक समाजातील बंधू भगिनी ऑनलाईन हजर होते.

‘भगवान परशुराम शास्त्र आणि शस्त्र विद्येत निपुण होते. त्यांच्यात क्षात्रतेज आणि ब्रह्मतेज यांचा संगम होता. अन्यायाविरुध्द त्यांनी त्यांचा धारदार परशू चालवून अत्याचारी वृत्तीचा नायनाट करून पृथ्वी सुखी केली. आजही त्यांच्या तत्वाने ब्राह्मण समाज वाटचाल करीत आहे. ज्ञान, धैर्य, शौर्य, प्रखर मातृभक्ती, तेजस्वी राष्ट्रभक्ती या गुणांच्या बळावर ब्राह्मण समाज अनेक वर्षांपासून भारतभूमीच्या उत्कर्षासाठी अविरत योगदान देत आला आहे व यापुढेही देत राहील. भारतीय लष्करात देखील मागील अनेक वर्षांपासून सातत्याने भरती होऊन प्रसंगी देशासाठी हौताम्य पत्करणारी अनेक धाडसी वीर जवान माणसे समाजाने राष्ट्रासाठी दिली आहेत. अनेकदा लष्कराच्या विविध विभागांना यशस्वी नेतृत्व दिले आहे. तसेच त्यागाची वेळ जेव्हा येते तेव्हा सर्वात पुढे असणारा हा समाज बुद्धिमत्ता, गुणवत्ता यांच्या बळावर भक्कम विश्वास ठेवणारा असल्याने सरकाकडून काहीही न मागता मी देशासाठी व इतरांसाठी काय देऊ शकतो असा विशाल विचार करणारा आहे’ असे प्रा.कुलकर्णी म्हणाल्या.

दरम्यान, कार्यक्रमाचा शुभारंभ ब्रह्मर्षी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन अरुण कुलकर्णी यांच्या हस्ते करून वेदमंत्रांच्या घोषासह श्री रामरक्षा पठणाने करण्यात आला. वैद्य यांनी प्रास्ताविक केले. भाऊ जाखडी यांनी प्रतिष्ठानच्या समाजोपयोगी कार्याची संक्षिप्त माहिती दिली. प्रा.कुलकर्णी यांचा परिचय विशाल जाखडी यांनी करून दिला तर सागर काळे यांनी आभार प्रदर्शन केले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Visits: 84 Today: 2 Total: 434835

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *