सरकारने दुधाला किमान हमीभाव द्यावा ः कानवडे
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नैसर्गिक आपत्ती, कमी बाजारभाव, खते-औषधांच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेती करणे मुश्किल होत आहे. अशा परिस्थितीत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरत आहे. मात्र, सद्यस्थितीत अल्पबाजार मिळत असल्याने राज्य सरकारने दुधाला किमान हमीभाव द्यावा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हाध्यक्ष कानवडे यांनी म्हटले आहे की, दुधाचा उत्पादन खर्च मोठा असून, दिवसाला सरासरी 120 रुपयांचा तोटा होत आहे. मात्र, दुसरीकडे बाजारात 40 ते 45 रुपये दराने दूध खरेदी करावे लागते. यातील फरक कोठे जातो, असा सवाल करत राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याचा आरोप केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी उत्पादकांच्या खात्यावर 5 रुपये प्रतिलिटरचे अनुदान देऊन मदत केली. सध्या कोविडच्या संकटामध्ये शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत असताना राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सरकारने दुधाला किमान हमीभाव जाहीर करावा. तसेच सहकारी व खासगी असा भेदभाव न करता तत्काळ 10 रुपये प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे.

