पठारभागातील भोजदरी येथील शेतकर्‍याचा देशी जुगाड खरीपाच्या पेरणीसाठी यंत्राला जुंपले कुटुंबातील चार सदस्यांना

नायक वृत्तसेवा, घारगाव
सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने वापसा झालेल्या शेतता पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. अनेक शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करत असल्याचे चित्र दिसत आहे. तर अनेक शेतकरी जीवापाड जपलेल्या सर्जा-राजाच्या जोडीला जुंपून पेरणी करत आहे. मात्र, दोन्हीही साधने उपलब्ध नसल्याने संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील एका शेतकर्‍याने देशी जुगाड करुन पेरणी केली आहे.

पठारभागातील भोजदरी गावांतर्गत असलेल्या बाळंद्री येथील खंडू महादू काळे या शेतकर्‍याला पेरणीसाठी ट्रॅक्टर आणि बैलजोडीही उपलब्ध होईना. त्यातच वापसा झाला असल्याने पेरणी लगेचच करणे गरजेची होती. मात्र, सर्व प्रयत्न करुनही दोन्ही साधने उपलब्ध झाले नाही. यामुळे ते हतबल न होता त्यांनी देशी जुगाड करण्याचा निर्णय घेतला आणि कोणत्याही परिस्थितीत पेरणी करायचीच असा चंग बांधला. त्यानुसार त्यांनी कुटुंबातील सदस्यांना जुगाडाबाबत कल्पना दिली. त्यावर सदस्यांनीही होकार दर्शविला.

त्यानंतर शेतकरी काळे यांनी पेरणी यंत्रास मागे दोन व पुढे दोन अशा चौघांना जुंपले आणि भुईमूग व सोयाबिनची पेरणी केली. त्यांचा हा अनोखा जुगाड पाहण्यासाठी परिसरातील शेतकर्‍यांनीही मोठी गर्दी केली होती. तर अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्या जुगाडाला दाद दिली. एकीकडे मानवनिर्मित संकट तर दुसरीकडे निसर्गनिर्मित संकटामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असते. तरी देखील मोठ्या हिंमतीने काळ्या आईची सेवा करणारा शेतकरीच खरोखर ‘अन्नदाता’ असल्याचे यावरुन अधोरेखित होते.

सध्या खरीपाचा हंगाम सुरू असून खत आणि बियाणांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यातही ते उपलब्ध होण्यासाठी मोठी कसरत होते. एवढे करुनही पेरणी करण्यासाठी साधने उपलब्ध होत नाही. अशा एक ना अनेक संकटांना तोंड देवून शेतकरी हंगाम यशस्वीरित्या काढण्यासाठी धडपड करत असल्याचेच यावरुन दिसत आहे.

Visits: 22 Today: 1 Total: 115867

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *