जिल्ह्यात सलग तिसर्या दिवशी चारशेहून अधिक बाधितांची भर! संगमनेर शहरातील रुग्णगतीही वाढली; तालुक्यात आज पस्तीस रुग्ण आढळले..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
बाजारपेठा उघडल्याने व लग्नकार्यांना मर्यादीत उपस्थितीत परवानगी देण्यात आल्याने जिल्ह्यात त्याचे काही प्रमाणातील दुष्परिणाम समोर येवू लागले आहेत. निर्बंध हटले म्हणजे संकट टळल्याचे समजून कोविड नियमांकडे दुर्लक्ष होवू लागल्याने जिल्ह्यासह संगमनेर तालुक्याच्या सरासरीत वाढ झाली आहे. आजच्या अहवालातून शुक्रवारच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असली तरीही सरासरीनुसार ती वाढलेलीच आहे. आज शहरी रुग्णसंख्येतही किंचित वाढ होवून दहा जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले. तर ग्रामीणभागातील कोविड मुक्त गावांमध्ये पुन्हा संक्रमण होण्याचा सिलसीला आजही कायम आहे. आजच्या अहवालातून तालुक्यातील विस गावे आणि वाडी-वस्त्या मिळून एकूण 25 जणांसह तालुक्यातील 35 जणांना कोविडची लागण झाली. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येत भर पडून ती आता 23 हजार 54 झाली आहे.
मोठ्या रुग्णसंख्येचा आघात झेलणार्या संगमनेर तालुक्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्येच्या वेगाला मर्यादा पडल्या. या सात दिवसांत दैनिक रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने तालुक्याची सरासरीही ढासळली. त्यामुळे संक्रमणाची दुसरी लाट ओसरल्यासारखे चित्र निर्माण झाले. मात्र त्याचवेळी तिसर्या लाटेच्या रुपाने कोविडचा डेल्टा प्लस हा नवा अवतारही सज्ज असल्याने राज्य सरकारद्वारा राज्याच्या टास्क फोर्सने संक्रमणाचा दर व उपलब्ध वैद्यकीय सुविधा या आधारावर तयार केलेल्या पाच श्रेण्यांपैकी तिसर्या श्रेणीतील निर्बंध जाहीर करण्यात आले. राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये गेल्या सोमवारपासून हे निर्बंध लागू आहेत. त्यात लग्नकार्यासाठी केवळ पन्नास जणांच्या उपस्थितीला परवानगी आहे.
जानेवारीत कोविडचे पहिले संक्रमण उताराला लागलेले असतांना नागरिकांनी लग्नकार्याच्या माध्यमातून नियमांना पायदळी तुडविल्याने आणि प्रशासनानेही कोविड गेल्याचे समजून डोळे मिटल्याने संक्रमणाची दुसरी लाट येवून आदळली. या लाटेत तालुक्यात 20 हजारांहून अधिक जणांना बाधित केले, तर शेकडों जणांचे जीवही घेतले. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतांनाही नागरिकांमध्ये कोणाच्या लग्नाला अधिक पाहुणे यात स्पर्धा लागल्याने फेब्रुवारीपासून परिस्थिती बिघडण्यास सुरुवात झाली ती जून संपेपर्यंत सुरु होती. आता कोठेतरी त्यातून दिलासा मिळत असल्याचे चित्र दिसत असतांना पुन्हा तालुक्याच्या ग्रामीणभागात कोविडचे नियम तोडून लग्नाचे बार उडविले जावू लागले आहेत. मर्यादेपेक्षा अधिक गर्दी जमविली जात असल्याने अजूनही वेशीवर असलेली दुसरीच लाट पुन्हा माघारी फिरण्याची भिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन दिवसांत वधारत असलेली रुग्णसंख्याही तेच संकेत देत आहे.
आज शासकीय प्रयोगशाळेचे आठ, खासगी प्रयोगशाळेचे 22 आणि रॅपीड अँटीजेनच्या निष्कर्षातील पाच अहवालातून संगमनेर शहरातील दहा जणांसह तालुक्यातील एकूण 35 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात शहरातील देवीगल्ली परिसरातील 27 वर्षीय तरुण, वाडेकर गल्लीतील 34 वर्षीय महिला, अभिनव नगरमधील 64 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता असलेल्या 80 व 26 वर्षीय महिलेसह 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 45 व 22 वर्षीय तरुण, 17 वर्षीय मुलगा व एक वर्षीय बालकाचा समावेश आहे. त्यासोबतच आज तालुक्यातील 20 गावे व वाड्या-वस्त्यांमधून 25 जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले. त्यात घुलेवाडीतील 36 वर्षीय महिला व 35 वर्षीय तरुण, निळवंडे येथील 77 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, गुंजाळवाडी शिवारातील गोल्डनसिटी येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक,
कनोली येथील 45 वर्षीय इसमासह 27 वर्षीय तरुण, बोटा येथील 70 वर्षीय महिला, आंबी दुमाला येथील 45 वर्षीय इसमासह 38 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 69 वर्षीय महिला, कोठे बु. येथील 75 वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 वर्षीय महिला व 39 वर्षीय तरुण, म्हसवंडी येथील 47 वर्षीय इसम, निमगाव जाळी येथील 42 वर्षीय तरुण, पानोडी येथील 58 वर्षीय इसम, समनापूर येथील 35 वर्षीय तरुण, साकूर येथील 45 वर्षीय इसम, आंबी खालसा येथील 71 वर्षीय ज्येष्ठ इसम, खराडी येथील 18 वर्षीय तरुणी, चणेगाव येथील 29 वर्षीय तरुण, भोजदरी येथील 52 वर्षीय इसम, प्रतापपूर येथील 30 वर्षीय तरुण व नांदूर येथील 40 वर्षीय महिलेचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 23 हजार 54 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
आज सलग तिसर्या दिवशी जिल्ह्याची रुग्णसंख्या चारशेपेक्षा अधिक राहीली. आजही पारनेर तालुक्यातून सर्वाधीक 54 रुग्ण समोर आले. पाथर्डी व श्रीगोंदा तालुक्यातून प्रत्येकी 36, संगमनेर व नेवासा तालुक्यातून प्रत्येकी 35, कर्जत तालुक्यातून 32, शेवगाव तालुक्यातून 31, जामखेड व राहुरी तालुक्यातून प्रत्येकी 29, राहाता तालुक्यातून 23, अकोले तालुक्यातून 17, नगर ग्रामीणमधून 15, श्रीरामपूर व अहमदनगर महापालिका क्षेत्रातून प्रत्येकी बारा, कोपरगाव तालुक्यातून सहा व अन्य जिल्ह्यातील चार अशा एकूण 406 जणांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 81 हजार 219 झाली आहे.