ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ अकोलेत भाजपचे चक्का जाम आंदोलन महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात व्यवस्थित बाजू न मांडल्याचा आरोप

नायक वृत्तसेवा, अकोले
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) आरक्षण रद्द झाले आहे. त्यातच निवडणूक आयोगाने काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारला व्यवस्थित बाजू मंडता न आल्याने मराठा समाजाप्रमाणेच इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का बसल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने अकोले बस आगारासमोर चक्का जाम आंदोलन आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.

या आंदोलनावेळी बोलताना जिल्हा परिषदेतील भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार असून ह्या सरकारला सर्व सामान्य जनतेचे काहीही देणे घेणे नाही. यापूर्वी मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यानंतर आता इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का दिला आहे. त्यातच निवडणूक आयोगाने काही जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या असून त्यातील इतर मागासवर्गीयांच्या जागा सर्वसाधारण जागांतून भरण्यात येणार आहेत. त्यामुळे राजकीय आरक्षण संपुष्टात येणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला मागील आधिवेशनात संभाव्य धोका सांगूनही सरकारने न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नाही असा आरोप त्यांनी केला.

या आंदोलनाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पुंडे यांनी केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अॅड. वसंत मनकर, पंचायत समिती सभापती उर्मिला राऊत, भाजप महिला जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी, रेश्मा गोडसे, सरचिटणीस मच्छिंद्र मंडलिक, राहुल देशमुख, अंकुश थोरात, राजेंद्र देशमुख, हितेश कुंभार, नरेंद्र नवले, संदीप दातखिळे, विजय सारडा, गोकुळ वाघ आदी उपस्थित होते.

