तहसिल कार्यालयातील लाचखोर लिपिकास चार वर्षांचा कारावास! नायब तहसिलदारांची मात्र निर्दोष मुक्तता; कनोलीतील वाळु ठेकेदाराकडून स्वीकारली होती लाच..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आठ वर्षांपूर्वी लिलावाद्वारे अधिकृत वाळुचा ठेका घेवूनही त्याच्यावर कारवाईचा बनाव करीत तत्कालीन नायब तहसिलदार व त्यांचा कनिष्ठ लिपिक यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबतच्या तक्रारीनंतर अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 16 हजारांची लाच स्वीकारतांना कनिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोहींवर खटला सुरु होता, त्याचा आज निकाल लागला असून अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश डी.एस.घुमरे यांनी लाचखोर कनिष्ठ लिपिक सुभाष विठ्ठल भारती याला चार वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर तत्कालीन नायब तहसिलदार शितल सावळे यांची मात्र या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली आहे.
याबाबतची हकिकत अशी की, कनोली येथील उत्तम पर्बतराव वर्पे यांनी 2014 साली लिलावाद्वारे प्रवरानदी पात्रातून वाळु उचलण्याचा अधिकृत परवाना मिळविला होता. त्यानुसार त्यांना 31 सप्टेंबर 2014 पर्यंत वाळु उचलण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्या दरम्यान 13 जून 2014 रोजी संगमनेर तहसिल कार्यालयातील कनिष्ठ लिपिक सुभाष विठ्ठल भारती याने कनोलीजवळ त्या ठेकेदाराचे दोन ट्रॅक्टर पकडले व त्यांचा पंचनामा करुन संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला.
सदरची गोष्ट समजताच वाळु ठेकेदार वर्पे यांनी पिपिक भारती यांची भेट घेतली असता त्यांनी कायदेशीर प्रक्रीया पूर्ण झाल्याचे सांगत तुमचा परवाना व वाळुच्या पावत्या घेवून नायब तहसिलदार शितल सावळे यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने प्रत्येकी दोन ब्रासच्या एकूण 25 पावत्या घेवून 4 जुलै 2014 रोजी नायब तहसिलदार शितल सावळे यांची तहसिल कार्यालयात जावून भेट घेतली. त्यांच्यातील चर्चेनंतर नायब तहसिलदार सावळे यांनी कारवाई टाळण्यासाठी फिर्यादीकडून 20 हजारांची मागणी केली. यावेळी फिर्यादीने आपल्या जवळील वाळु वाहतूकीचा परवाना व पावत्या दाखवूनही त्यांनी बाकीचे सांगू नका, पैसे द्या नाहीतर कारवाईला सामोरे जा असे फिर्यादीला ठणकावून सांगितले.
या प्रकारानंतर फिर्यादीने एक-दोन दिवसांत पैशांची व्यवस्था करतो तो पर्यंत वाट बघा असे सांगत थेट अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक अशोक देवरे यांची भेट घेवून सगळा प्रकार कथन केला. त्यानुसार त्यांची तक्रार नोंदवून त्यांना आवश्यक त्या सूचना देत माघारी पाठविण्यात आले. ठरल्याप्रमाणे 7 जुलैरोजी फिर्यादीसह एका साक्षीदाराला नायब तहसिलदारांकडे पाठविण्यात आले, यावेळी मागण्यात आलेली रक्कम कमी करण्याची विनंती तक्रारदाराने केली. त्यानुसार दुसर्या दिवशी 16 हजार रुपये देण्याचे ठरले.
ठरल्याप्रमाणे 8 जुलै 2014 रोजी सकाळी दोन पंचासह 16 हजारांच्या नोटांना लाचलुचपत विभागाची विशिष्ट पावडर लावून त्यांना संगमनेरच्या तहसिल कार्यालयात पाठविण्यात आले. यावेळी कार्यालयात हजर असलेले कनिष्ठ लिपिक सुभाष विठ्ठल भारती (वय 54, रा.मूळ पढेगाव, ता.कोपरगाव) यांच्याकडे 16 हजारांची रक्कम सोपविण्यात आली, याचवेळी लाचलुचपत विभागाच्या पथकाने छापा घालीत त्यांना रंगेहाथ पकडले व त्याच्यासह नायब तहसिलदार शितल राजधर सावळे यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7, 12, 13 (1) (ड) सह 13 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचे दोषारोपपत्र संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्यावरील सविस्तर सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद व सरकारी पक्षाने सादर केलेले चार साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात सरकारी पक्षाने सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरुन अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश डी.एस.घुमरे यांनी आरोपी क्रमांक दोन सुभाष विठ्ठल भारती याला भ्रष्टाचार कायद्याचे कलम 7 अन्वये 3 वर्ष सक्तमजूरीची शिक्षा व तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, तसेच कलम 13 (2) नुसार चार वर्ष सक्त मजूरी व 4 हजारांचा दंड, दंड न भरल्यास 4 महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. तर आरोपी क्रमांक एक तत्कालीन नायब तहसिलदार शितल राजधर सावळे यांना मात्र संशयाचा फायदा देत त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली.
सदर खटल्याचे संपूर्ण कामकाज सरकारी अभियोक्ता बी.जी.कोल्हे यांनी पाहीले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार एस.डी.सरोदे, कैलास कुर्हाडे, पो.हे.कॉ.प्रवीण डावरे, चंद्रकांत तोर्वेकर, पो.ना. दीपाली दवंगे व पो.कॉ.स्वाती नाईकवाडी यांनी सहकार्य केले. आजवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केवेळ सापळे लावून कारवाया होतात, मात्र त्यात त्यातून कोणत्याही लाचखोराला शिक्षा होत नाही असा समज जनमानसात निर्माण झाला होता. मात्र या निकालाने तो खोडून निघाला असून महसूल विभागाच्या लाचखोर कनिष्ठ लिपिकाला कारावास पत्करावा लागला आहे.