अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलगी गरोदर! पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल; मुलाची रवानगी बालसुधारगृहात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही दिवसांपासून विविध गुन्हेगारी घटना समोर येणार्‍या संगमनेर तालुक्यातून आता एक अतिशय धक्कादायक आणि पालकांची चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका चौदावर्षीय मुलाने आपल्याच परिसरातील तेरावर्षीय मुलीशी शरीरसंबंध प्रस्थापित केल्याने सदरील मुलगी अडीच महिन्यांची गरोदर राहिली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात अत्याचारासह पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेतले आहे. सोमवारी त्याला नगरच्या बाल न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी श्रीरामपूर येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार तालुक्यातील जवळे कडलग शिवारातील एका वस्तीवर घडला. यातील चौदावर्षीय आरोपीने तो राहत असलेल्या परिसरातील 13 वर्षीय मुलीला आमिष दाखवून 10 सप्टेंबर 2021 ते 24 जून 2022 या कालावधीत वेळोवेळी आपल्या घरी नेत तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. गेल्या रविवारी (ता.7) पीडित मुलगी आपल्या आईसह घरात असतांना तिला अचानक चक्कर येवून ती खाली पडली. त्यामुळे घाबरलेल्या तिच्या आईने तिला जवळे कडलग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिची तपासणी करीत पुढील उपचारांसाठी संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.


त्यानुसार तिच्या आई-वडीलांनी तिला ग्रामीण रुग्णालयात आणले असता सदरील मुलगी अडीच महिन्यांची गरोदर असल्याची बाब समोर आली. तिच्या वयाचा आणि आरोग्याचा विचार करुन वैद्यकीय अधिकार्‍यांनी पीडितेला अहमनगरच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर पीडितेच्या वडीलांनी तिच्यासह थेट तालुका पोलीस स्टेशन जवळ करीत घडला प्रकार कथन केला. त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन आरोपीच्या विरोधात भा.दं.वि. कलम 376 (2)(एफ)(एन) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे कलम 4, 5 ज, (2), एल, 6 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास उपनिरीक्षक विजय खंडीझोड यांच्याकडे सोपविला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल होताच आरोपी मुलाला ताब्यात घेवून सोमवारी (ता.8) त्याला नगरच्या बाल न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी श्रीरामपूर येथील बालसुधारगृहात केली आहे. तर पीडित मुलीची जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी केल्यानंतर तिला नगरच्या स्नेहालय संस्थेत पाठविण्यात आले आहे. या घटनेत आरोपी आणि पीडित दोन्ही अल्पवयीन असल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पालकांची चिंताही वाढली आहे.

Visits: 94 Today: 1 Total: 1106701

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *