ग्रामपंचायत विकासात प्रशासकांकडून अडथळे?
ग्रामपंचायत विकासात प्रशासकांकडून अडथळे?
नायक वृत्तसेवा, नगर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलेला असूनही निवडणूक घेता येणार नसल्याने गामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. यावरुनही खूप राजकारण झाले. परंतु आता या प्रशासकांची नेमणूक ग्रामपंचायत विकासात अडथळे आणत असल्याचे चित्र उभे राहिले आहे.
आधीच कामात व्यस्त असलेल्या प्रशासकांनी गावात कोणत्याही प्रकारच्या योजनांना सुरुवात केली नसून ग्रामपंचायतीच्या विकासाला खीळ बसत आहे. जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने त्याठिकाणी शासकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी तसेच एकात्मिक बालविकास प्रकल्पातील पर्यवेक्षिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकार्यांनी गावात जाऊन पदभार स्वीकारला आहे. मात्र, त्यानंतर गावात प्रशासक फिरकलेच नसल्याच्या तक्रारी आता ग्रामस्थांकडून ऐकायला मिळत आहेत. यामुळे ग्रामस्थांची अनेक कामे रखडली असून गावाच्या विकासाला खीळ बसली असल्याने निवडणूक लवकरात लवकर घ्यायला हवी, अशी मागणी अनेकांकडून आता होऊ लागली आहे.