संगमनेर तालुक्यातील ‘कोरोना मुक्त’ गावांची संख्या शंभराच्या खाली! ‘अनलॉक’ प्रक्रियेत नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा निष्कर्ष..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्याच्या कोविड संक्रमणाचा वेग नियंत्रणात आला असतांनाही प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण मात्र थांबलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये रुग्णसंख्येचा चढ-उतार पाहायला मिळत आहे. संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येचा फुगवटा ओसरला असला तरीही रुग्ण समोर येण्याची श्रृंखला मात्र कायम आहे. जिल्हा अनलॉक झाल्यानंतर कोविड नियमांच्या प्रती काहीशी शिथीलता दिसत असल्याने आजही रुग्ण समोर येण्याची प्रक्रीया सुरुच आहे. त्यातच यापूर्वी ‘कोविड मुक्त’ झालेली तालुक्यातील गावेही आता पुन्हा संक्रमित होवू लागल्याने संगमनेरातील कोविड मुक्त गावांची संख्याही शंभरीखाली आली आहेत. आज शहरातील रुग्णसंख्या मात्र पुन्हा खालावली असून तालुक्यातील एकूण 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या आता 22 हजार 790 झाली आहे.

सलग दोन महिने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हाहाकार उडविणार्‍या कोविडने जूनच्या सुरुवातीपासून जिल्ह्याला मोठा दिलासा दिला आहे. गेल्या महिन्यात एकवेळ जिल्ह्याचा सरासरी रुग्ण समोर येण्याचा दैनिक वेग चार हजार रुग्णांवर पोहोचला होता. मात्र जूनच्या सुरुवातीपासूनच संक्रमणाचा वेग प्रचंड मंदावत जावून आजच्या स्थितीत जिल्ह्यात दररोज सरासरी 649 रुग्ण समोर येत आहेत. अशा स्थितीत संक्रमण खालावत जावून नगण्य व्हावे असे अपेक्षित असतांनाही जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दररोज समोर येणार्‍या रुग्णसंख्येचा चढ-उतार अनुभवायला मिळत आहे. याचाच अर्थ कठोर निर्बंधातून मुक्त झालेले अनेक नागरिक कोविडला विसरुन बिनधास्त वावरत असल्याने संक्रमण टिकून असल्याचा निष्कर्षही वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील संगमनेरसह राहाता, पारनेर व नेवासा तालुक्यातील रुग्णसंख्येचा चढउतार चिंताजनक आहे. अचानक एखाद्या दिवशी खाली असलेली रुग्णसंख्या उसळी घेत दुप्पट-तिप्पट होत असल्याने नागरिकांच्या मनात धस्स होतं आहे. यावरुन वरील विधानाला बळही मिळत आहे. मागील आठवड्यात संगमनेर तालुक्यातील 172 पैकी 108 गावे कोविड मुक्त म्हणजे रुग्णसंख्येच्या बाबतीत शून्य झाली होती. मात्र त्यातील दहा गावांची कोविड मुक्ति आठवडाभरही तग धरु शकली नाही. गेल्या सहा दिवसांतच कोविड मुक्त असलेल्या 108 गावांतील दहा गावांमध्ये पुन्हा संक्रमण सुरु झाल्याचे समोर आले आहे. यावरुन संगमनेर तालुक्याच्या ग्रामीणभागात कोविड नियमांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्टपणे समोर येवू लागले आहे. नागरिकांचा हा हलगर्जीपणाच दुसरी लाट आणण्यास कारणीभूत ठरला होता, आता पुन्हा एकदा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेच्या 13, खासगी प्रयोगशाळेच्या 17 व रॅपिड अँटीजेनच्या निष्कर्षातील नऊ जणांसह संगमनेर तालुक्यातील 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात संगमनेर शहरातील अवघे तिघे, ग्रामीण भागातील 32, अन्य ठिकाणचे दोन व दोघांची नावे दुबार आहेत. शहरातील विद्यानगर परिसरातील 39 वर्षीय महिला, ऑरेंज कॉर्नर वरील 53 वर्षीय महिला व संगमनेर असा पत्ता असलेल्या 27 वर्षीय महिलेचा बाधित झालेल्यांमध्ये समावेश आहे. तर ग्रामीण भागातील जोर्वे येथील 55 वर्षीय महिला, नांदूर खंदरमाळ येथील 37 वर्षीय महिला, साकूर येथील 75 वर्षीय वयोवृद्धासह 57 वर्षीय इसम व 56 वर्षीय महिला, कनोलीतील 40 वर्षीय महिला व 20 वर्षीय तरुण, जाखूरी येथील 23 वर्षीय तरुण, धांदरफळ बु. येथील 34 वर्षीय तरुण, कोंची येथील 55 वर्षीय इसमासह 50 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 21 व 18 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 36 वर्षीय महिला, वरवंडी येथील 25 वर्षीय तरुण,

पिंपरी येथील 35 वर्षीय तरुणासह 22 वर्षीय महिला, निमगाव पागा येथील 31 वर्षीय तरुण, लोहारे येथील 42 व 35 वर्षीय तरुणासह 35 वर्षीय महिला, कासारवाडीतील 49 व 25 वर्षीय महिला, कोठे बु. येथील 48 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथील 35 वर्षीय महिला, 32 वर्षीय तरुण आणि 12 व 10 वर्षीय मुली, खांडगाव येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, प्रतापपूर येथील 26 वर्षीय महिला, डिग्रस येथील 33 वर्षीय तरुण, आश्वी बु. येथील 28 वर्षीय तरुण, तसेच गणोरे येथील 61 वर्षीय महिला व चिखलठाण येथील 17 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वरवंडी येथील 25 वर्षीय तरुण व पिंपरी येथील 35 वर्षीय तरुणाचे नाव दुबार आले आहे. तालुक्यात आजच्या स्थितीत 285 जणांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यातील रुग्णसंख्या आज सलग चौथ्या दिवशी पाचशेच्या खाली राहीली. आज शासकीय प्रयोगशाळेच्या 47, खासगी प्रयोगशाळेच्या 146 आणि रॅपीड अँटीजेनच्या निष्कर्षातून जिल्ह्यातील 484 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. त्यात पारनेर 89, श्रीगोंदा 61, शेवगाव 55, संगमनेर 39, राहुरी 36, नेवासा 27, नगर ग्रामीण 26, अकोले व पाथर्डी प्रत्येकी 23, कोपरगाव 20, जामखेड आणि कर्जत प्रत्येकी 17, राहाता 15, श्रीरामपूर 14, इतर जिल्ह्यातील 12 व महापालिका क्षेत्रातील दहा रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 77 हजार 705 झाली आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 30687

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *