रिमांड होममधून अल्पवयीन मुलाचे अपहरण संगमनेरात खळबळ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्याकाही दिवसांत संगमनेरात विविध प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना ऊत आलेला असताना आता त्यात अत्यंत धक्कादायक घटनेची भर पडली आहे. रविवारी सायंकाळी समोर आलेल्या या घटनेत संगमनेरच्या बाल अधीक्षण गृहातील (रिमांड होम) एक नऊवर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात इसमाकडून अपहरण झाले आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिराने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेतून रिमांड होमसारखी ठिकाणंही असुरक्षितच असल्याचेही समोर आले आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना रविवारी (ता.21) सायंकाळी 5 ते 7 यावेळेत बी.एड्.कॉलेजशेजारी असलेल्या बाल अधीक्षण गृहात घडली. या प्रकाराबाबत तेथील काळजीवाहक कर्मचारी बाळकृष्ण आमले यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कृष्णा माळी असे नाव असलेला हा नऊवर्षीय मुलगा गेल्या 3 मे रोजीच अधीक्षण गृहात दाखल झाला होता. आई-वडील हयात नसलेल्या या निरागस मुलाला त्याच्या काकाने एका मेंढपाळाकडे सोपविले होते. मात्र त्याला ते सहन न झाल्याने त्याने 3 मे रोजी त्या मेंढपाळाच्या तावडीतून सुटका करुन घेत तेथून पलायन केले.

तो पळून जात असताना पारेगाव गडाखच्या पोलीस पाटलांना त्याचा संशय आल्याने त्यांनी त्याला थांबवून विचारपूस केली असता त्याच्या बोलण्यातील विसंगती त्याला संशयात्मक वाटल्याने त्यांनी त्याला तालुका पोलीस ठाण्यात आणले. तेथे त्यांच्याकडून माहिती घेत पोलिसांनी त्याला त्याच दिवशी बाल अधीक्षण गृहात पाठवले, मात्र अवघ्या 20 दिवसांतच त्याचे तेथून अपहरण झाले. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात अपहरणाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल यांच्याकडे सोपविला आहे. या वृत्ताने रिमांड होमच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 118134

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *