शहरातील गुटखा ‘तस्करी’ रोखण्यात पोलीस अपयशीच! तस्करांना धाकच उरला नाही; चहाच्या टपरीतही तब्बल सोळा हजारांचा गुटखा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरातील बेकायदा उद्योग काही केल्या बंद होत नसल्याचे चित्र वारंवार समोर येत असून आता संगमनेरातील अतिउच्चभ्रू वसाहत समजल्या जाणार्या ऑरेंज कॉर्नर परिसराचे नाव चर्चेत आले आहे. या वसाहतीच्या मुखाशी शासकीय जागेत अतिक्रमण करुन चहाचे दुकान चालविणाराच गुटखा तस्कर म्हणून समोर आला आहे. शहर पोलिसांनी त्याच्या पाच बाय पाच फुट आकाराच्या टपरीवर मारलेल्या छाप्यात तब्बल 16 हजारांचा गुटखा आढळला असून तो बाळगणार्या जाकीर यूसुफ पठाण याला गजाआड करण्यात आले आहे. या कारवाईने गुटख्यासह अन्य अवैध व्यवसायिकांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याने मनात येईल तेथून अवैध उद्योग सुरु झाल्याचेही दिसून आले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी बुधवारी (ता.23) सायंकाळी शहरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणार्या ऑरेंज कॉर्नर परिसरात शासकीय जागेत अतिक्रमण करुन चहाची टपरी चालविणार्या ठिकाणावर छापा घातला. यावेळी चहा पिणार्यांच्या गर्दीसह तेथे उगाच हेलपाटे मारणार्यांची संख्या पाहून आपण योग्य ठिकाणी पोहोचल्याचा विश्वास पोलीस पथकाच्या मनात निर्माण झाला. यावेळी पथकातील कर्मचार्यांनी ‘त्या’ टपरीची झाडाझडती घेतली असता त्यांचे डोळेच पांढरे झाले.

साधारणतः पाच बाय पाच फूट आकाराच्या या टपरीतील प्रत्येक कोपर्यात हात घातला की तेथून गुटख्याचे पुडे बाहेर पडू लागले. यावेळी संबंधित टपरीचालकाने आरडाओरड करण्यासह गयावया करण्याचा फंडाही वापरुन पाहिला. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करीत संपूर्ण टपरीची तपासणी केली असता त्यातून हिरा व आरएमडी (माणिकचंद) कंपनीचा गुटखा व त्यात मिसळली जाणारी सुगंधीत तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळली. टपरीच्या कानाकोपर्यात दडवून ठेवलेला सगळा गुटखा हुडकून बाहेर काढल्यानंतर त्याची मोजदाद केली असता त्या टपरीत 11 हजार चारशे रुपयांचे हिरा कंपनीच्या पान मसाल्याचे 95 पाकीट, एक हजार दोनशे साठ रुपये किंमतीचे आरएमडी (माणिकचंद) कंपनीच्या पान मसाल्याचे तीन पाकीट, प्रत्येकी 300 रुपये किंमतीचे सुगंधीत तंबाखूचे तीन व पान मसाल्यात मिसळायच्या रॉयल 717 तंबाखूचे 2 हजार 490 रुपये किंमतीचे 83 पाकीट असा एकूण 16 हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल पोलीस पथकाला आढळला.

याप्रकरणी पो.कॉ.सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी संशयित आरोपी जाकीर यूसुफ पठाण (वय 34) याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 328, 188, 272, 273 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 च्या विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता.23) रात्रीच संशयिताला अटक करण्यात आली असून आज त्याला न्यायालसासमोर उभे केले जाणार आहे. या कारवाईने संगमनेरात सर्वत्र गुटखा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याच्या चर्चांना पाठबळ मिळाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहरातील अवैध धंद्यांना मोठा ऊत आला आहे. देशाचे भविष्य समजल्या जाणार्या तरुणांना मृत्यूच्या दारात नेणार्या गुटख्यासारख्या घातक प्रकारांवर राज्यात संपूर्ण बंदी असतानाही आजवर या बंदीचा कोणताही परिणाम गुटखा उद्योगावर झाला नाही. उलट शासनाने हा उद्योग कायदेशीर मार्गाने बंद करुन शासकीय महसूल बंद केला व अन्न व भेसळ विभागासह पोलिसांना हा व्यवसाय आंदण देवून राज्यभर त्याच्या तस्करीचे जाळे विणण्यास एकप्रकारे हातभारच लावला आहे. आजवर संगमनेरातील फेरीविक्रेत्यांपासून किरकोळ व ठोक विक्रेत्यांवर शेकडो वेळा कारवाया झाल्या आहेत. मात्र राज्यात गुटखा बंदी लागू होवून दशकाचा कालावधी उलटूनही संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात गुटख्याचा पुरवठा करणार्या निमगाव जाळीतील संतोष डेंगळे या सर्वात मोठ्या गुटखा तस्करापर्यंत मात्र संगमनेर पोलीस कधीही पोहोचू शकले नाहीत. यावरुनच जिल्ह्यातील गुटखा तस्करीचे वलय किती गडद आहे याचा अंदाज येतो.

गुटखा व्यसनाच्या आहारी जावून आजची तरुण पिढी मृत्यूच्या दिशेने ओढली जात असल्याने दशकापूर्वी राज्य सरकारने राज्यात गुटख्याचे उत्पादन करणे, त्याचा साठा करणे, तो वितरीत करणे व त्याची विक्री करणे या संपूर्ण प्रक्रियेवर पूर्णतः बंदी घातली. मात्र तेव्हापासून या क्षणापर्यंत राज्यात कोठेही गुटख्याचा तुटवडा निर्माण झाला नाही. बुधवारी ऑरेंज कॉर्नर जवळ झालेली कारवाई सह्याद्री महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर तर संगमनेर महाविद्यालयाच्या मार्गावरील आहे. यावरुन या तस्कराचे ग्राहक कोण असतील याचा सहज अंदाज येतो.

