भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.लोंढेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश संगमनेर येथील महसूल मंत्र्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसह केला प्रवेश
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील अस्तगावचे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा अस्तगाव ग्रामपंचायतीचे युवा ग्रामस्थ विकास मंडळाचे नेते अॅड.पंकज लोंढे यांनी भाजपच्या हुकूमशाही कार्यपद्धतीला वैतागून काँग्रेस नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये काम करण्यासाठी नुकताच शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे.
संगमनेर येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी अॅड.पंकज लोंढे व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी काँग्रेस नेते सुरेश थोरात, शिर्डी मतदारसंघाचे सचिन चौगुले, राहाता शहराध्यक्ष नितीन सदाफळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन गाडेकर यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी माजी उपसरपंच किरण गायकवाड, दादासाहेब गवांदे, महेश त्रिभुवन, सतीश आग्रे, प्रवीण घोडेकर, दिलीप नळे, समद शेख, गणेश चोळके यांसह अस्तगावच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी बोलताना अॅड.लोंढे म्हणाले, भाजप हा हुकूमशाही पद्धतीने राज्य करू पाहत आहे. पक्षाची मूळ विचारधारा बाजूला होऊन काही शक्ती तालुका, जिल्हा ताब्यात घेऊ पाहत आहे. या अत्यंत लोकशाहीला घातक आहे. देशातील भाजपची नीती ही चुकत आहे. याउलट काँग्रेस मात्र कायम जनसामान्यांसाठी काम करत राहिला आहे. त्यातच काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे स्वच्छ नेतृत्व हे भाजपातील अनेक कार्यकर्त्यांसाठी आकर्षण ठरले आहे. जनसामान्यांच्या विकासाचे काम करायचे असेल तर आपल्या समाजासाठी काम करताना आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर काँग्रेस हा पक्ष अत्यंत चांगला आहे. मंत्री थोरात यांचे नेतृत्व सर्वांना समान न्याय देणारे असून त्यांनी कधीही पक्षपात केला नाही व कायम लोकशाहीलाच प्राधान्य दिले. अशा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली काम करणे अत्यंत अभिमानास्पद राहणार आहे. त्यामुळे माझ्यासह प्रवरा परिसरातील हजारो कार्यकर्ते लवकरच काँग्रेसमध्ये येण्यासाठी अत्यंत उत्सुक असल्याचे शेवटी सांगितले.