कोण म्हणतं बंद आहेत? कत्तलखान्यावर पुन्हा छापा! संगमनेरचा कलंक मिटेना; ‘टीप’वरुन शहर पोलिसांची कारवाई..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
हजारांत कारवाया, लाखों किलो मांस, कोट्यवधीचा मुद्देमाल आणि शेकडों आरोपींच्या कोठडीनंतरही संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखान्यांना चाप बसलेला नाही. राज्यातील काही मोठ्या शहरांसह कर्नाटकपर्यंत गोमांस पुरवठा करणार्‍या या बेकायदा उद्योगातून कोट्यवधीची उलाढाल होत असल्याने पोलिसांची भूमिकाही नेहमीच संशयास्पद राहीली आहे. प्रत्येक कारवाईत मुख्य सूत्रधाराला सोडून पंटरवर गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रियेतून वेळोवेळी ते सिद्धही झाले आहे. शुक्रवारी रात्रीही शहर पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या ‘टीप’नंतर त्यांनी ‘गॅरेज’चा बोर्ड लावून सुरु असलेल्या गोवंश कत्तलखान्यावर छापा घातला. या कारवाईत जवळपास पावणे दोन टन गोवंशाचे मांस आणि आयशर कंपनीचा टेम्पो असा एकूण 15 लाख 50 हजारांचा मुद्देमालही हस्तगत केला गेला. मात्र गुन्हा दाखल करताना पुन्हा एकदा ‘सूत्रधारा’ला वगळून ‘पंटर’वरच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे या कारवाईनंतरही येथील बेकायदा कत्तलखान्यांना कोणाचे अभय आहे हे लपून राहिलेले नाही.


याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची कारवाई शुक्रवारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली. गोवंश कत्तलखान्यांचा परिसर म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या कोल्हेवाडी रस्त्यावरील ‘केजीएन गॅरेज’च्या आडून गोवंशाच्या कत्तलीचा उद्योग सुरु होता. रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी या बेकायदा कत्तलखान्यावर छापा घातला तेव्हा गॅरेजच्या समोरील मोकळ्या पटांगणात बिनधास्तपणे मूक्या गोवंशाचे गळे चिरले जात असल्याचे पथकाला दिसले. या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 1 हजार 750 किलो गोवंशाचे मांस आणि 12 लाख रुपयांचा आयशर कंपनीचा टेम्पो (क्र.एम.एच.17/बी.वाय.0489) असा एकूण 15 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.


या प्रकरणर पोलीस काँन्स्टेबल योगेश थटार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन महाराष्ट्रात गोवंश जनावरांची कत्तल करण्याच्या इराद्याने त्यांची वाहतूक, कत्तल व कत्तल केलेले गोवंशाचे मांस वाहून नेण्यास मनाई करणार्‍या कायद्याचे कलम 5 (क), 9 प्रमाणे आरोपी नय्युम सुल्तान शेख (वय 20, रा.श्रमिकनगर) व रेहान अल्ताफ शेख (वय 19, रा. इस्लामपूरा) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकी माहिती मिळाल्यानंतर एकप्रकारे पोलिसांना ही कारवाई करणं भाग होतं. मात्र या कारवाईत देखील पोलिसांनी आपल्या अर्थपूर्ण ‘हितसंबंधांना’ हात लागू दिला नाही हे गुन्हा दाखल झाल्यानंतर स्पष्टपणे दिसून आलं.


संगमनेरातून मुंबई, मालेगांव, छत्रपती संभाजीनगर, तसेच गुलबर्गा, हैद्राबादपर्यंत गोमांसाचा पुरवठा केला जातो. त्यासाठी लागणारी जनावरे संगमनेर तालुक्यासह कोतुळ व थेट गुजरातमधून आणली जातात. गेल्या दहा वर्षात येथील कत्तलखान्यांवर शेकडोंवेळा छापे पडले आहेत. आजवर लाखों किलो गोवंशाचे मांस हस्तगत होण्यासह कोट्यवधीचा मुद्देमाल आणि शेकडों कसायांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तीन वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर 2021 रोजी या भागातील दहा साखळी कत्तलखान्यांवर अहमदनगर पोलिसांनी एकाचवेळी छापा घातला होता. त्यावेळी 31 हजार किलो गोवंशाच्या मांसासह 73 जिवंत जनावरे, वाहने असा एकूण सव्वाकोटी रुपयांहून अधिक किंमतीचा मूद्देमालही जप्त करण्यात आला होता.


या कारवाईनंतर संगमनेरात कत्तलखान्यांविरोधात आंदोलनही झाले. त्यावेळी पहिल्यांदाच थेट तत्कालीन शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या विरोधात भूमिका घेतली गेली आणि त्यांच्या निलंबनाच्या मागणीनेही जोर धरला. मात्र त्यांच्या डोक्यावर त्यावेळच्या आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे ‘छत्र’ असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. आंदोलनाने पोलिसांवर दबाव निर्माण झाल्याने त्यावेळी भारतनगर परिसरातील बेकायदा कत्तलखाने उध्वस्त केल्याचेही भासवण्यात आले. त्यातून आता येथील कत्तलखाने कडेकोट बंद होतील असाच समज निर्माण झाला होता, मात्र तो संभ्रम होता हे सिद्ध व्हायला फारसा वेळ लागला नाही. संगमनेरात मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या या बेकायदा व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल होते.

कायद्याच्या राज्यात कोणताही बेकायदा धंदा पोलिसांची नजर चुकवून सुरु रहाणंं अशक्य आहे. त्यामुळे अशा व्यवसायाचा शुभारंभच पोलिसांना पहिला नारळ फोडून करावा लागतो. येथील कत्तलखान्यांचा विषय तर नेहमीच ‘हॉट’ राहिला आहे. त्यामुळे त्याचा बाऊ होवून दुपटी-तिपटीने भाव वधारले आहेत. अशा स्थितीत ते कडेकोट बंद राहतील ही अपेक्षाही मिथ्या आहे. त्याचाच प्रत्यय कोल्हेवाडी रस्त्यावरील गॅरेजवर झालेल्या कारवाईतून मिळत आहे. सदरील कत्तलखाना कोणाचा आहे याचीही माहिती पोलीस निरीक्षकांना माहिती देणार्‍याने सांगितली होती. मात्र कारवाई करताना ‘त्या’ दोघांनाही वगळण्यात येवून त्यांच्या जागवेर ‘पंटर’ हजर करण्यात आले आहेत.


शुक्रवारी रात्री शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर कोल्हेवाडी रस्त्यावरील ‘केजीएन गॅरेजवर’ छापा घातला. यावेळी 1 हजार 750 किलो गोवंशाच्या मांसासह 15 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करीत पोलिसांनी दोघांवर गुन्हाही दाखल केला. मात्र त्यानंतरही पोलिसांवरील संशय कमी झालेला नाही. सदरचा कत्तलखाना परिसरातील कसायांचा ‘म्होरक्या’ समजल्या जाणार्‍या व्यक्तिंचा होता. माहिती देणार्‍याने या गोष्टी पोलिसांनाही सांगितल्या होत्या. मात्र गुन्हा दाखल होताना पंटरचाच वापर झाल्याने कधीही बंद नसलेले येथील कत्तलखाने सुरळीत राहण्यासाठी कोणाचं पाटबळ मिळतंय हे देखील ठळकपणे समोर आले आहे.

Visits: 22 Today: 2 Total: 79346

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *