कारभारी बदलल्यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ ः पिचड कळस बुद्रुक येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
नायक वृत्तसेवा, अकोले
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मिळालेली मंजूर कामे अकोले तालुक्यात सुरू आहेत. कारभारी बदलल्यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसली असून वर्षभरात एकही नवीन काम आणता आले नाही, अशी टीका भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री वैभव पिचड यांनी केली.
कळस बुद्रुक येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे, विष्णू वाकचौरे, संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक सीताराम वाकचौरे, माजी सरपंच कारभारी वाकचौरे, यादव वाकचौरे, डी.टी.वाकचौरे, निवृत्ती मोहिते आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना महामंत्री पिचड म्हणाले, अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली गावचा विकासाच्या दृष्टीने कायम कळस झाला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे गेली दहा वर्षे नेतृत्व करताना त्यांनी अकोले तालुक्याला भरपूर निधी उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष गायकर म्हणाले, माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आम्हांला जिल्ह्यात नेतृत्व करण्याची संधी दिली. त्या संधीतून समाजोपयोगी काम केली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगळी ओळख कैलास वाकचौरे यांनी निर्माण केली असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कळसेश्वर देवस्थान संरक्षक भिंत, भवानी माता मंदिर सभामंडप, सांगवी रस्ता ते हरिजन वस्ती रस्ता, जिल्हा परिषद शाळा चार खोल्या, बिबवे वस्ती रस्ता डांबरीकरण आदी विकासकामांचे भूमिपूजन तर शाळा संरक्षक भिंतीचे उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर आभार प्रा.विवेक वाकचौरे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन नूतन ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गवांदे, ज्ञानेश्वर वाकचौरे, जिजाबा वाकचौरे, दत्तात्रय वाकचौरे, केतन वाकचौरे, संगीता भुसारी, संगीता चौधरी, स्नेहल वाकचौरे, स्वाती सरमाडे, नामदेव निसाळ, गोरख वाकचौरे यांनी केले होते.