निळवंडे जलाशयाचे ‘मधुकर सागर’ नामकरण करा! माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या वाढदिवसानिमित्त धरणग्रस्तांची एकमुखी मागणी
नायक वृत्तसेवा, अकोले
निळवंडे जलाशयाची उभारणी व विस्थापित झालेल्या शेतकर्यांचे आदर्श पुनर्वसन करून राज्यात निळवंडे पॅटर्न राज्याला दिशा देणारा ठरला. त्याचे सर्व श्रेय माजी मंत्री मधुकर पिचड यांनाच जाते. राज्यात कुणी काही म्हणू मात्र निळवंडेचे खरे शिल्पकार पिचडच आहेत. त्यामुळे सरकारने निळवंडे जलाशयाचे नामकरण करून ‘मधुकर सागर’ असे नाव द्यावे, अशी एकमुखी मागणी निळवंडे धरणग्रस्तांनी केली आहे.
निळवंडे धरणग्रस्त शेतकर्यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांचा 80 वा वाढदिवस निळवंडे जलाशयावर केक कापून साजरा केला. यावेळी जलाशयाच्या भिंतीवर शेतकरी पिचड यांची वाट पाहत होते. विठ्ठल आभाळे, यशवंत आभाळे, राजेंद्र डावरे, माजी सरपंच देविदास कोकणे, माजी उपसभापती मधुकर पिचड, विठ्ठल आवारी, भाऊसाहेब कासार, भाऊसाहेब नाईकवाडी, कृष्णा मेंगाळ, निळवंडे, निंब्रळ येथील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी विठ्ठल आभाले म्हणाले, निळवंडे जलाशयात बुडीत झालेल्या शेतकर्यांना न्याय देण्याचं काम मधुकर पिचड यांनी केले. त्यामुळे या धरणाचे नाव बदलून मधुकर सागर असे द्यावे. तसेच आमच्या धरणग्रस्तांच्या आयुष्यातील प्रत्येक एक वर्ष घेऊन मधुकर पिचड यांनी शंभर वर्ष जगून विकास कामे करावीत. शंभरावा वाढदिवस सुद्धा याच जलाशयावर साजरा व्हावा अशी सदिच्छा व्यक्त केली.
यशवंत आभाळे म्हणाले, दुष्काळग्रस्त भाग असलेल्या तळेगाव, सिन्नर भागातील शेतकर्यांचे प्रपंच फुल विणण्याचे काम ज्यांनी केले. निळवंडे व कालवे होण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले, त्या मधुकर पिचड यांच्या नावाने जलाशयाला मधुकर सागर नाव सरकारने द्यावे अशी मागणी आम्ही करीत आहोत. पाया भरणीवेळी, घळभरणी व धरण पूर्ण झाल्यानंतर पिचड यांचा वाढदिवस निळवंडे जलाशय ठिकाणी झाला हा योगायोग आहे, असेही आभाळे यांनी नमूद केले.