वाळूचोरीतील आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
वाळूचोरीतील आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
राहाता तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाळूचोरी प्रकरणातील आरोपी संदीप तबाजी वडितके (रा.गळनिंब, ता.श्रीरामपूर) यास श्रीरामपूर न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी बी. जी. पवार यांनी तीन वर्षे सश्रम कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा नुकतीच सुनावली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आरोपी संदीप वडितके हा प्रवरा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करताना 15 नोव्हेंबर, 2016 रोजी आढळून आला होता. या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी एकनाथ सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं.152/2016 भादंवि कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. शिंदे यांनी श्रीरामपूर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी होऊन सात साक्षीदार तपासत आरोपी संदीप वडितके यास प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी बी. जी. पवार यांनी तीन वर्षे सश्रम कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अधिक 6 महिन्यांची शिक्षा सुनावल्याचे नमूद केले आहे. सुनावणी दरम्यान सरकारी अभियोक्ता एल. आर. वळवी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस नाईक के. बी. पंडित यांनी काम पाहिले.

