साईभक्तांनी ऑनलाईन दर्शन पास घेऊनच यावे! कोविडमुळे डबल मास्कही लावावे; संस्थानचे आवाहन

नायक वृत्तसेवा, शिर्डी
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणारे भाविक आणि संस्थानच्या कर्मचार्यांसाठी नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. भाविकांनी व संस्थानाच्या कर्मचार्यांनी मंदिरात येताना डबल मास्क लावूनच यावे. तसेच, दर्शनार्थींनी ऑनलाईन दर्शन पास घेऊनच यावे, असे आवाहन संस्थानने केले आहे.

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी यासंबंधी सूचना दिल्या आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार, भाविकांनी डबल मास्क लावावे, वारंवार हात सॅनिटाइज करावेत, सामाजिक अंतराचे पालन करावे, दर्शनासाठी प्रवेश करताना दर्शन रांगेतील इतर वस्तूंना आणि श्रींच्या समाधीस स्पर्श करू नये. याशिवाय मंदिरात फुले, हार व इतर पूजेचे साहित्य नेण्यास सक्त मनाई आहे. पदयात्री पालखी मंडळांनी पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये. प्रकृती बरी नसलेल्या साईभक्तांनी दर्शनासाठी येऊ नये. याबरोबरच दर्शन पास वितरण काऊंटरवर होणार्या गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी साईभक्तांनी ऑनलाईन दर्शनपास उपलब्ध करून निर्धारीत वेळेतच शिर्डीत दर्शनासाठी यावे, असे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे. यासोबतच संस्थानच्या कर्मचार्यांनाही विशेष दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना काळात बंद असलेले साई समाधी मंदिर 7 ऑक्टोबरपासून काही अटींवर खुले करण्यात आले आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे संपले नसतानाच आता ओमिक्रॉन या व्हेरियंटचा धोका वाढत आहे. त्यामुळे आणखी खबदारी घेण्यात येत आहे. साईभक्तांनी आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. सलग सुट्टीच्या कालावधीत, गुरुवार, शनिवार, रविवार तसेच शासकीय सुट्टी अथवा महत्वाच्या धार्मिक दिवशी जास्त गर्दी होते. याकाळात साईबाबांचे दर्शन घेऊ इच्छिणार्या साईभक्तांनी संस्थानच्या online.sai.org.in या संकेतस्थळावरुन आगाऊ ऑनलाईन दर्शन पास बुक करावा. ऑनलाईन दर्शन पास निश्चित झाल्यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
