भेंडा येथील बडोदा बँकेकडून कर्जासाठी अडवणूक मंगळवारी शाखेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील बँक ऑफ बडोदा शाखेचे शाखा व्यवस्थापक राहुल गोलियत हे खातेदारांना कर्ज पुरवठा करताना अडवणूक करत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता. 11) शाखेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सौंदाळा गावचे माजी सरपंच शरद अरगडे यांनी सांगितले.

याबाबतचे निवेदन शाखा व्यवस्थापकांना देण्यात आले असून त्यात म्हटले की, सौंदाळा गावातील 6 महिलांचे जिल्हा उद्योग केंद्राकडून विविध व्यवसायासाठी कर्ज मंजूर करून बँक ऑफ बडोदा शाखेत पाठवले आहेत. तेव्हा खातेदार कर्ज घेण्यासाठी बँक व्यवस्थापकांना भेटले असता व्यवस्थापक यांनी तुम्हाला कर्ज मिळणार नाही तुम्ही इकडे येऊच नका असे उद्धटपणे बोलले. बँक व्यवस्थापक तोंड पाहून काम करतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांनाच कर्ज पुरवठा करतात.

तळागाळातील गोरगरीब कुटुंब आपल्या पायावर उभे राहणेसाठी व्यवसाय कर्ज घेऊ इच्छितात तर त्यांना बँकेचे कर्ज मिळणार नाही असे बोलतात. परीणामी खासगी सावकारकीला खतपाणी घालण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे याचा निषेध करून कर्ज मागणीसाठी धरणे आंदोलन करणार असल्याचे मुक्ता नंदकिशोर बोधक, पार्वती प्रल्हाद नाईक, आशाबाई दिनकर आरगडे, रेणुका गणेश अरगडे, सुनीता रामदास वाकचौरे, रिजवाना लतीफ शेख, हसीना रमजान शेख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
