अंमळनेरमध्ये दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या आवळल्या मुसक्या सोनई पोलिसांची कारवाई; दरोड्याच्या साहित्यासह एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील अंमळनेर येथे दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांच्या सोनई पोलिसांनी सोमवारी (ता.10) पहाटे पावणेचारच्या सुमारास मुसक्या आवळल्या आहेत. तर इतर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले असून, एक लाख एक हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत सोनई पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अंमळनेर येथील चौकात अंधाराचा फायदा घेत ओम्नी कार व पाच संशयित आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी घटनास्थळाहून पलायन केले. पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यातील तिघांना शस्रासह मोठ्या शिताफीने पकडले. सागर संतोष गायकवाड (वय 25, रा.झापवाडी रस्ता, घोडेगाव), रमेश केशव जाधव (वय 23, रा.रामनगर बिडकीन, ता.पैठण) व विकी पोपट जाधव (वय 27, रा.सलामपूरानगर, ता.जि.औरंगाबाद) यांना पकडले. तर इतर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले.
सदर आरोपींकडून मिरचीची पूड, लोखंडी गज, सुरा, लाकडी दांडा, 1000 रुपये किंमतीचा मोबाईल व एक लाख रुपये किंमतीची मारुती ओम्नी कार (क्र.एमएच.13, एन.6468) असा एकूण एक लाख एक हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 151/2021 भादंवि कलम 399, 402 सह भारतीय शस्र अधिनियम कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर वरील आरोपींपैकी सागर गायकवाड याच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं.4857/2020 भादंवि 452, 323 तर दुसरा गुन्हा शिंगणापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 20/2018 भादंवि कलम 379 तर दुसरा आरोपी विकी जाधव याचे विरुध्द वाळुंज एमआयडीसी पोलीस ठाणे औरंगाबाद येथे गु.र.नं.520/2015 भादंवि कलम 394, 34 नुसार गुन्हे दाखल आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षिका डॉ.दीपाली काळे, नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सोनई ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. टी. कर्पे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, सहाय्यक उपनिरीक्षक संजय चव्हाण, पोलीस नाईक शिवाजी माने, मुख्य हवालदार मारुती पवार, पोलीस शिपाई बाबा वाघमोडे यांनी केली.