एकरी पाच लाखांचे उत्पन्न देईल राहुरी विद्यापीठाचे रोल मॉडेल! सेंद्रीय शेती प्रकल्पातून विद्यापीठाने कमावले पन्नास लाख रुपये
नायक वृत्तसेवा, राहुरी
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी विद्या विभागांतर्गत सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत 46 एकर क्षेत्रावर एकात्मिक सेंद्रीय शेतीचे रोल मॉडेल विकसित करण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून विद्यापीठाचे शास्त्रज्ञ त्यासाठी झटत आहेत. शेतकर्यास वार्षिक किमान पाच ते सहा लाख रूपयांचे खात्रीपूर्वक उत्पन्न कसे मिळविता येईल याबद्दल मार्गदर्शन येथील शास्त्रज्ञ करीत आहेत. हा प्रकल्प देशपातळीवर रोल मॉडेल ठरणार यात शंका नाही, अशी माहिती प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.उल्हास सुर्वे यांनी दिली.
विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, विद्यमान कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उल्हास सुर्वे व सेंद्रीय शेती संशोधन प्रकल्पाच्या विविध विभागाची टीमद्वारे विद्यापीठाचा अनेक वर्षांपासून पडीक किंवा पारंपारिक लागवड सुरू असलेल्या जमिनीवर 46 एकर क्षेत्रावर सेंद्रीय शेती संशोधन सुरू आहे.
येथील पिकांवर विद्यापीठाचेच जिवाणू खते, जैविक कीटकनाशके वापरली जातात. येथे काही क्षेत्रावर बीजोत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीन, जाम-जेलीसाठी पेरू, पल्पसाठी सीताफळ तसेच उसाच्या चार विविध वाणांची लागवड केलेली आहे. काही क्षेत्रावर भाजीपाला लागवड केलेली आहे, यामध्ये मिरची, कांदा, कोथिंबीर, मेथी तसेच भेंडी अशा विविध भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. लवकरच येथे देशी गायी, शेळ्या, कोंबड्याचेही पालन सुरू करण्यात येणार आहे, येथीलच प्रक्षेत्रावर सेंद्रीय चारा लागवड करण्यात येणार आहे. विविध सेंद्रीय शेतकर्यांना गट करुन प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे डॉ. उल्हास सुर्वे यांनी सांगितले.
विद्यापीठाला 50 लाखांचे उत्पन्न..
तिसर्याच वर्षी विद्यापीठाचा सेंद्रीय शेती प्रकल्प स्वयंपूर्णतेकडे गेला आहे. या प्रक्षेत्रावरील पिकांच्या विक्रीद्वारे विद्यापीठाच्या महसुली उत्पन्नामध्ये भरीव वाढ होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून शासनाचा एक रुपयाही न घेता या प्रकल्पाने स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू केली आहे. बीजोत्पादनाद्वारे फिरता निधी 18 लाखांचा तसेच विविध पिकांच्या पिकांवरील चाचण्यांद्वारे 32 लाखांचे उत्पन्न असे एकूण 50 लाखांचे निव्वळ उत्पन्न या प्रकल्पाने मिळविले आहे.