कोविड संक्रमणात सलग दुसर्या दिवशी संगमनेर तालुका अव्वलस्थानी! जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली; मात्र संगमनेर तालुक्याने ओलांडला एकोणावीस हजारांचा टप्पा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या दिड महिन्यापासून चढाला लागलेली जिल्ह्यातील कोविड रुग्णसंख्या मागील दोन दिवसांपासून काही प्रमाणात खालावल्याने जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र त्याचवेळी संगमनेर तालुक्यातील संक्रमणाचा वेग आजही कायम असल्याने, किंबहुणा गेल्या दोन दिवसांत त्याला काहीसा वेग आल्याने जिल्ह्यात ‘कहीं खुशी, कही गम’ असे विरोधाभासी चित्र निर्माण झाले आहे. आज जिल्ह्यात एकूण 3 हजार 184 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले, त्यात संगमनेर तालुक्यातील तब्बल 361 तर अकोले तालुक्यातील 276 जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात आजही या दोन्ही तालुक्यात सर्वाधीक रुग्ण आळले असून आजवर पहिल्या क्रमांकावर असलेले अहमदनगर महापालिका क्षेत्र थेट नवव्या स्थानावर गेले आहे. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुक्याने एकोणावीस हजारांचा टप्पाही ओलांडला आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरी रुग्णांची संख्या अवघी 47 असून उर्वरीत सर्व रुग्ण ग्रामीण क्षेत्रातील आहेत.

फेब्रुवारीच्या मध्यात राजकीय व सामाजिक दिग्गजांच्या विवाह सोहळ्यातून गावोगावी पोहोचलेल्या कोविडच्या दुसर्या संक्रमणाने गेल्या तीन महिन्यात जिल्ह्याची कोविड स्थिती अतिशय चिंताजनक अवस्थेत पोहोचवली आहे. कोविडच्या दुसर्या लाटेतील बहुतेक रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होवून ऑक्सिजन घ्यावे लागत असल्याने कोविडची दाहकताही वाढली आहे. एकीकडे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत असतांना दुसरीकडे रुग्णालयीन खाटांसह ऑक्सिजन, रेमडेसिवीर व अन्य औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. असे असतांनाही जिल्ह्यात केवळ ‘कडक निर्बंधां’चा फार्स लावून नागरिकांना फिरण्यास मोकळीकच असल्याने गेल्या महिन्याभरापासून लागू असलेल्या निर्बंधांचा कोणताही परिणाम रोजच्या रुग्णसंख्येवर झाल्याचे आजवर दिसून आलेले नाही.

चालू-बंद, लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध या गोंधळात मागील निम्मा महिना गेला. आत्तापर्यंतच्या कोविड संक्रमणाचा उच्चांक ठरलेल्या एप्रिलमध्ये जिल्ह्यात दररोज सरासरी 2 हजार 671 रुग्ण या गतीने 80 हजार 134 रुग्ण, तर संगमनेर तालुक्यात सरासरी 215 रुग्ण या गतीने 6 हजार 445 रुग्ण आढळले होते. चालू महिन्यातही मागील 17 एप्रिलपासून जिल्ह्यात लागू असलेले ‘कठोर निर्बंध’ कायम ठेवण्यात आले, मात्र अद्यापपर्यंत त्याचा कोणताही परिणाम जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या संक्रमण गतीवर झाल्याचे दिसले नाही. मागील 1 ते 11 मे या अकरा दिवसांच्या जिल्ह्याच्या सरासरीवर कटाक्ष टाकल्यास ही गोष्ट स्पष्ट होते. मागील अकरा दिवसांमध्ये जिल्ह्यासह संगमनेर तालुक्याच्या सरासरीत मोठी वाढ होवून जिल्ह्यात दररोज 3 हजार 774 रुग्ण इतक्या प्रचंड गतीने 41 हजार 518 तर संगमनेर तालुक्यात 354 रुग्ण या वेगाने आत्तापर्यंत 3 हजार 899 रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यातील कोविडचे संक्रमण अजूनही भरातच असले तरीही तालुक्यात ‘रमजानच्या नावाने चांगभलं’ सुरु असून कोविड नियमांची आठवण करुन देणार्या पोलिसांवरच हल्ले होत आहेत.

आज शासकीय प्रयोगशाळेकडून 273, खासगी प्रयोगशाळेकडून 62 व रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा 26 अशा संगमनेर तालुक्यातील एकूण 361 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. आजच्या अहवालात ‘संगमनेर’ अशा अर्धवट शिर्षकाखाली रुग्ण नोंदणीला चाप बसल्याचे दिसल्याने शहरी रुग्णसंख्या अवघ्या 47 वर आली, मात्र त्याचवेळी ग्रामीणभागातील संक्रमणाचा वेग कायम राहील्याने तालुक्यावरील चिंतेचे ढग कायम आहेत. विशेष म्हणजे सोमवार आणि आजचा मंगळवार रुग्णसंख्येच्या बाबतीत संगमनेर तालुका अवघ्या जिल्ह्यात अव्वलस्थानी असून आजच्या अहवालात अकोले तालुकाही दुसर्यास्थानी पोहोचला आहे. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुक्याने बाधितांचे 19 वे शतक पार करुन 19 हजार 74 रुग्णसंख्या गाठली आहे.

संगमनेर तालुक्यातील एकसारखी रुग्णवाढ चिंताजनक ठरत असतांना गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याला मात्र काहीसा दिलासा मिळाला असून रुग्णसंख्या काही प्रमाणात माघारी फिरली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेच्या 1 हजार 348, खासगी प्रयोगशाळेच्या 1 हजार 94 व रॅपिड अँटीजेन चाचणीच्या 742 अहवालांमधून जिल्ह्यातील 3 हजार 184 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यात संगमनेर 361, अकोले 276, पाथर्डी 269, पारनेर 246, नगर ग्रामीण 239, कर्जत 225, नेवासा 209, राहुरी 196, अहमदनगर महापालिका क्षेत्र 195, श्रीरामपूर 183, शेवगाव 169, राहाता 155, कोपरगाव 135, जामखेड 129, श्रीगेांदा 112, इतर जिल्ह्यातील 49, भिंगार लष्करी परिसरातील 34, लष्करी रुग्णालय व अन्य राज्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्हा आता 2 लाख 16 हजार 557 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.

