सावधान! निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात 10 हजार 642 क्यूसेकचा विसर्ग!! नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा; संततधार सुरुच असल्याने विसर्गात वाढ होणार..


नायक वृत्तसेवा, अकोले
मागील 36 तासांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या तुफान पावसाने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा तांत्रिक पातळीवर पोहोचवल्यानंतर आता धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याकडून प्राप्त अंदाजानुसार पावसाचा जोर टिकून राहणार असल्याने धरणांच्या सुरक्षिततेसह नदीकाठावरील वसाहतींचे नुकसान होवू नये यासाठी निळवंडे धरणाचा पाणीसाठा 90 टक्क्यांवर नियंत्रित करण्यात आला असून दुपारी चार वाजता धरणाच्या सांडव्याद्वारे तब्बल 10 हजार 642 क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. पाणलोटात संततधार कायम असल्याने धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता असून नदीकाठावरील गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.


गेल्या आठवड्याभर विश्रांती घेणार्‍या मान्सूनचे मुळा व प्रवरा खोर्‍यात जोरदार पुनरागमन झाले असून मागील चार दिवसांपासून अकोले तालुक्याच्या पश्‍चिम घाटमाथ्याला पावसापासून उसंत मिळालेली नाही. त्याचा परिणाम मुळा, भंडारदरा व निळवंडे या तिनही धरणांच्या पाणीसाठ्यात जलदगतीने वाढ झाली असून उत्तर नगरजिल्ह्याला वरदान ठरलेला 11 हजार 39 दशलक्ष घनफूट क्षमतेचा भंडारदरा प्रकल्प आज सकाळी 11 वाजताच तांत्रिकदृष्ट्या ओव्हर फ्लो झाला आहे. दुपारी चार वाजता या धरणाचा पाणीसाठा 10 हजार 586 दशलक्ष घनफूटावर नियंत्रित करण्यात येवून धरणाच्या सांडव्याद्वारे 4 हजार 724 क्यूसेक तर विद्धुतगृह मोरीद्वारे 826 क्यूसेक असा एकूण 5 हजार 550 क्यूसेकचा प्रवाह सोडण्यास सुरुवात झाली आहे.


भंडारदरा धरण भरल्यानंतर अवघ्या 12 ते 24 तासांत निळवंडे धरणही पूर्णक्षमतेने भरु शकते. मात्र सध्या पावसाची संततधार सुरुच असल्याने या दोन्ही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे भंडारदर्‍यापाठोपाठ निळवंडे धरणही ओव्हर फ्लो केल्यास व त्यानंतर पाणलोटातील पावसाचा जोर वाढल्यास धरणासह लाभक्षेत्रातील मानवी वस्ती व शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने गेल्या पंधरवड्यापासून धरण व्यवस्थापनाकडून परिचालन सूचीचे तंतोतंत पालन केले जात आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपूर्वी तांत्रिक पातळी गाठण्याची भंडारदर्‍याची परंपरा यंदाही कायम राहीली असली तरीही निळवंडे धरणाचा पाणीसाठा मात्र क्षमतेपर्यंत जावू दिला जाणार नाही हे निश्‍चित आहे.


सध्या निळवंडे धरणाच्या पाणलोटातील कृष्णवंतीच्या खोर्‍यातही तुफान पाऊस सुरु असून वाकी जलाशयाच्या भिंतींवरुन निळवंडे धरणात दिड हजार क्यूसेकहून अधिक पाणी दाखल होत आहे. त्यातच भंडारदर्‍यातून विसर्गात वाढ करण्यात आल्याने दुपारी चार वाजता निळवंडे धरणाचा पाणीसाठा 7 हजार 541 दशलक्ष घनफूटावर (90.54 टक्के) नियंत्रित करण्यात आला असून याच पातळीवर तासागणिक धरणात येणार्‍या पाण्याच्या प्रमाणात विसर्ग वाढवला जात आहे. सध्या निळवंड्यातून प्रवरा नदीपात्रात सांडव्याद्वारे 9 हजार 952 क्यूसेक तर विद्युतगृहाच्या मोरद्वारे 690 क्यूसेक असा एकूण 10 हजार 642 क्यूसेकचा विसर्ग सोडला जात आहे. त्यामुळे प्रवरेला मोठा पूर येणार असून नदीकाठावरील गावांना अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.


गेल्या चोवीस तासांतील पावसाचा जोर लक्षात घेता आज सायंकाळपर्यंत भंडारदरा धरण आपली तांत्रिक पातळी गाठेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र निसर्गाने तो फोल ठरवित अपेक्षेपेक्षा आधीच सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भंडारदर्‍याची पाणीपातळी तांत्रिक रेषेवर पोहोचवली. आज सकाळपासून धरणातील पाणीसाठा आणि सोडला जाणारा विसर्ग पाहता ही गोष्ट अधोरेखीत होते. सकाळी 6 वाजता भंडारदर्‍याचा साठा 10 हजार 313 दशलक्ष घनफूट (93.42 टक्के) होता, तर विसर्ग अवघा 826 क्यूसेकने सुरु होता. त्याचवेळी निळवंड्याचा पाणीसाठा 7 हजार 527 दशलक्ष घनफूट (90.38 टक्के) होता, तर धरणातून 4 हजार 880 क्यूसेकचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. सकाळी 9 वाजता भंडारदर्‍याच्या स्थितीत बदल होवून धरणाचा पाणीसाठा 10 हजार 454 दशलक्ष घनफूट (94.70 टक्के) झाल्याने धरणाच्या सांडव्याद्वारे 1 हजार 218 आणि विद्युतगृहाद्वारे 826 असा 2044 क्यूसेकचा विसर्ग सुरु करण्यात आला, मात्र निळवंड्याचा विसर्ग कायम ठेवण्यात आला.


त्यानंतरही पाणलोटातील पावसाचा जोर टिकूनच असल्याने धरणातील पाण्याची आवकही वाढली. त्यामुळे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भंडारदर्‍याने 10 हजार 500 दशलक्ष घनफूटाची (95 टक्के) तांत्रिक पातळी गाठली. त्या दरम्यान निळवंड्याचा पाणीसाठाही वाढू लागल्याने धरणातून सोडण्यात येणार्‍या विसर्गात बदल करुन तो 6 हजार 654 क्यूसेकवर नेण्यात आला. दुपारी 3 वाजता दोन्ही धरणातील पाण्याची आवक वाढतच राहील्याने पुन्हा एकदा भंडारदर्‍याचा वक्राकृती सांडवा आणखी वरती उचलून त्याद्वारे 5 हजार 550 क्यूसेक तर निळवंडे धरणातून 8 हजार 415 क्यूसेक इतका विसर्ग वाढवण्यात आला. अजूनही पाणलोटातील पावसाचा जोर कायम असून पुढील संकट टाळण्यासाठी भंडारदर्‍याचा विसर्ग आहे त्यावर स्थिर ठेवून दुपारी चार वाजता निळवंडे धरणाच्या सांडव्याद्वारे 9 हजार 952 क्यूसेक तर विद्युतगृहाद्वारे 690 क्यूसेक असा एकूण 10 हजार 642 क्यूसेकचा विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडला जात आहे.

Visits: 281 Today: 2 Total: 1584907

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *