कोकमठाण येथे गंगागिरी महाराज सप्ताहास प्रारंभ फुलांनी सजविलेल्या बग्गीतून रामगिरी महाराजांची मिरवणूक
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
उंट, अश्व, बँडबाजा, फटाक्यांची आतिषबाजी… योगीराज गंगागिरी महाराजांचा जयजयकार… डोक्यावर कलश घेतलेल्या महिला…. मुंबादेवी तरुण मंडळाच्या लहानग्यांच्या मैदानी खेळांची प्रात्यक्षिके… टाळ-मृदंगावर ठेका धरत भजने सादर करणारे भाविक… फुलांनी सजविलेल्या बग्गीतून सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांची काढलेली मिरवणूक… अशा भक्तीमय वातावरणात सद्गुरू श्री गंगागिरी महाराजांच्या 175 व्या अखंड हरिनाम सप्ताहाला सुरवात झाली.
कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र कोकमठाण येथे मंगळवारी सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या दोन वर्षांनंतर प्रथमच सप्ताह होत असल्याने, मोठी गर्दी झाली होती. मंगळवारी (ता. 9) सप्ताहाची सांगता होणार आहे. दुपारी बारा वाजता पुणतांबा चौफुली येथून महंत रामगिरी महाराजांच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. महिलांनी जागोजागी औक्षण केले. आत्मा मालिक आश्रम व शैक्षणिक संकुलाच्या तब्बल 350 विद्यार्थांनी मिरवणुकीत विशेष सहभाग नोंदवला. यावेळी साई संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे हेही महाराजांसोबत बग्गीत होते. मुंबादेवी तरुण मंडळाच्या मुलांनी लाठी-काठीसह मैदानी खेळांचे प्रात्यक्षिके सादर केली.
रामगिरी महाराज म्हणाले, कोरोना काळात आध्यात्मिक कार्यक्रम, वार्या बंद होत्या. त्याही काळात योगीराज गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची परंपरा बंद होऊ दिली नाही. आमदार आशुतोष काळे म्हणाले, की सप्ताह न भूतो न भविष्यति असाच होणार आहे. सप्ताह काळात आमदार म्हणून कुठेही काहीही कमी पडू देणार नाही. कोल्हे म्हणाले, की भाविकांनी पहिल्याच दिवशी लाखोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली. दोन वर्षांच्या खंडाची भर चालू वर्षी भरून निघणार आहे. सप्ताह समितीच्या वतीने अध्यक्ष सुधाकर रोहोम, संभाजी रक्ताटे, शरद थोरात आदींसह पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून सप्ताहाच्या तयारीसाठीचे कष्ट घेत आहेत.
भाविकांना पुरणपोळीचा महाप्रसाद..
सप्ताहाच्या ठिकाणी भक्तांना मांडे, पुरणपोळी व दुधाचा प्रसाद वाटण्यात आला. शिस्तबद्ध ठरलेल्या पंगतीला गोदावरी दूध संघाच्या वतीने मोफत दूध देण्यात आले. पुढील आठ दिवस येथे श्री गंगागिरी कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.