पठारभागातील तळेवाडी फाटा येथे एकास गंभीर मारहाण घारगाव पोलिसांत सात जणांविरुद्ध गुन्हा; जखमीवर उपचार सुरू

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात तळेवाडी फाटा येथे मंगळवारी (ता.15) एकास लोखंडी गजाने मारहाण करुन गंभीर दुखापत केली. याशिवाय जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोखरी बाळेश्वर येथील गणेश देवराम गफले हा तरुण शेतकरी व त्याचे मित्र तळेवाडी फाटा येथे थांबलेले असताना त्यावेळी यूवराज बाबासाहेब खरात हा तेथे येऊन फोनवरून कुणाला तरी शिवीगाळ करीत होता. त्यावेळी गणेश म्हणाला की, आमच्यापासून लांब जाऊन बोल. याचा राग आल्याने यूवराजने किशोर खरात, तुषार वावरे, गणेश शिंदे, बाबासाहेब खरात यांची पत्नी व मुलगा (सर्व रा.पिंपळगाव देपा) यांना बोलावले आणि बेकायदेशीर जमाव गोळा करुन गणेश व त्याच्या मित्रांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर यूवराजने गणेशच्या डोक्यात लोखंडी गज मारून गंभीर जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिली.

यामध्ये गणेश गफले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर संगमनेरातील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी गणेश गफले याने दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी वरील सात जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 33/2022 भादंवि कलम 326, 143, 147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल आदिनाथ गांधले हे करीत आहेत.
