माजीमंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभेवर? कारखान्याच्या चेअरमनपदाबाबत उत्सुकता; ज्येष्ठनेते पांडूरंग घुलेंच्या नावाची चर्चा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकीत संगमनेरात महायुतीला पहिल्यांदाच यश मिळाले. त्यामुळे यंदाच्या कारखाना निवडणुकीतही त्याचे प्रतिबिंब उमटतील असाच सर्वांचा कयास होता. मात्र विविध नाट्यमय घडामोडींनंतर विरोधकांनी ऐनवेळी माघार घेतल्याने यंदाही कारखान्याचे संचालक मंडळ बिनविरोध झाले. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळच्या कारखाना निवडणुकीत भाकरी फिरवल्याने त्यातून सत्ताधारी गटात काहीशी नाराजीही निर्माण झाली. यासर्व पार्श्‍वभूमीवर आता सभासदांमध्ये चेअरमनपदाची उत्सुकता ताणलेली असतानाच माजीमंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. असे घडल्यास त्यांच्याकडून चेअरमनपद नाकारले जाण्याची शक्यता असल्याने कारखान्याचा नवा चेअरमन कोण? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यावेळी संचालक मंडळावर दृष्टीक्षेप टाकल्यास इंद्रजीत थोरात यांच्या नावाचा पुसटसा उल्लेख सुरु आहे, मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता खूप कमी आहे. अशास्थितीत विद्यमान आमदारांच्या गटातील पांडूरंग घुले या एकमेव ज्येष्ठ सदस्यावर विश्‍वास टाकला जावू शकतो. मात्र याबाबत कोणीही ठामपणे सांगायला तयार नसून ‘कारखान्याचं कसं?’ या प्रश्‍नावर ‘साहेब म्हणतील तसं!’ हेच उत्तर कानावर पडत आहे.


गाव पुढार्‍यांचा अतिआत्मविश्‍वास, गावागावात निर्माण झालेले गट आणि प्रत्यक्ष जमीनस्तरापासून तुटलेली नाळ या त्रिसुत्रीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणातील भारदस्त व्यक्तित्व म्हणून ओळख असलेल्या माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतरच्या सहा महिन्यांतच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्याने यशाने आत्मविश्‍वास दुणावलेल्या महायुतीकडून या निवडणुकीतही ‘पॅनेल’ उभेे राहील असे वातावरण निर्माण झाले. आमदार अमोल खताळ यांनी ‘महायुती पूर्ण ताकदीने कारखाना लढवणार’ अशी घोषणाही केली. मात्र दरम्यानच्या काळात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींनी उमेदवारी दाखल करण्याच्या अगदी शेवटच्या क्षणी ‘सहकारात राजकारण नको!’ असे सांगत महायुतीने निवडणुकीतून पूर्णतः माघार घेतली.


विधासभेतील पराभवाची समीक्षा करताना त्यावेळच्या संचालक मंडळाने अपेक्षित काम केले नाही. परिणाम कारखान्याच्या संचालकांच्या गावातूनच पीछाडी मिळाल्याची अनेक उदाहरणे समोर आल्यानंतर माजीमंत्री थोरात यांनी कारखाना निवडणुकीत भाकरी फिरवण्याचा निर्णय घेत अपवाद वगळता बहुतेक संचालकांना नारळ दिला. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळात नव्या चेहर्‍यांचाच अधिक भरणा असल्याचेही दिसून आले. या निर्णयाने जुन्या पुढार्‍यांसह काही संचालकांमध्ये नाराजीही निर्माण झाली. मात्र खुद्द साहेबच चेअरमन होणार असल्याचे चित्र समोर दिसत असल्याने अशांनी आवंढा गिळून गप्प राहण्यातच समाधान मानले. त्यामुळे बिनविरोध नंतर चेअरमनपदावर थोरातच असतील असे वाटत असतानाच आता काँग्रेसच्या कोट्यातून त्यांची राज्यसभेसाठी निवड होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्याने नवा संभ्रम निर्माण झाला आहे.


यासर्व घडामोडी कारखाना सभासदांची उत्सुकता वाढवणार्‍या ठरत असून बाळासाहेब थोरात राज्यसभेवर गेल्यास कारखान्याची खुर्ची कोणाच्या वाट्याला यावरुन नव्या चर्चांना धुमारे फुटले आहेत. त्यातून थोरातांचे बंधु इंद्रजीत यांच्या नावाचीही चर्चा आहे. मात्र विधानसभेतील पराभवात त्यांच्या भूमिकेवरुनही शिमगा झाल्याने मोठ्या वर्गाकडून त्यांच्या नावाला विरोधही असल्याचे दिसून येत आहे. त्यातच यावेळी अपवाद वगळता बहुतेक संचालक कोरी पाटी असल्याने कारखान्याची जबाबदारी देताना भरवशासह अनुभवालाही जोखावे लागणार आहे. अशास्थितीत सहकारमहर्षींचे विश्‍वासू अशी ओळख असलेल्या आणि विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या धांदरफळ गटातील पांडूरंग घुले या एकमेव ज्येष्ठ संचालकाचे नाव आघाडीवर आले आहे.


पांडूरंग घुले म्हणजे अशोक मोरे यांच्यासमवेत उदयाला आलेले नाव असून अशोकरावांच्या निधनानंतर धांदरफळचा गढ राखण्यात त्यांची मुख्य भूमिका राहीली आहे. सद्यस्थितीत थोरातांना अपेक्षित असलेला सर्वसमावेशक, ग्रामीण भागाशी नाळ आणि दांडगा जनसंपर्क असलेल्या घुले यांच्याशिवाय सक्षम पर्याय नसल्याचेही बोलले जात आहे. मात्र थोरातांची राज्यसभा ते पांडूरंग घुलेंची चेअरमनपदावर वर्णी यासर्व गोष्टी केवळ चर्चेतल्या असून त्यावर कोणत्याही माध्यमातून अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. सद्यस्थितीत चर्चेत असलेल्या कर्नाटकात काँग्रेसकडे तीन राज्यसभा असून त्यातील केवळ मल्लिकार्जुन खरगे यांची एकमेव जागा पुढील वर्षी जूनमध्ये रिक्त होणार आहे. त्यामुळे थोरातांचा राज्यसभेचा मार्ग कोणत्या राज्यातून जाणार यावरुनही उत्सुकता आणि संभ्रम कायम आहे. येत्या पंधरवड्यात त्यावरील पडदा हटण्याचीही शक्यता आहे. मात्र सध्या संगमनेर मतदारसंघात ‘थोरातांची राज्यसभा’ आणि ‘कारखान्याचे चेअरमनपद’ चांगलेच ट्रेंड असल्याचे दिसून येत आहे.


विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सहकार पातळीवर बदल करताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्याच त्या चेहर्‍यांना नारळ देवून नव्यांना संधी दिली. त्यामुळे यावेळी कारखान्याचे चेअरमनपदही त्यांच्या कडेच राहील असे चित्र निर्माण झाले होते. मात्र आता काँग्रेसने त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी केल्याची चर्चा असल्याने अशास्थितीत कारखान्याचे चेअरमन कोण होणार याबाबतची उत्सुकताही ताणली जात आहे. त्यातून वेगवेगळी नावे समोर येत असून दहा वर्ष बाजार कमिटीचे यशस्वी चेअरमन राहीलेल्या पांडूरंग घुले यांचे नाव आघाडीवर आहे.

Visits: 322 Today: 5 Total: 1107816

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *