प्रवरासंगम येथील बिंगो जुगारावर पोलिसांचा छापा 22 हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोघेजण ताब्यात

नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील प्रवरासंगम येथे पत्र्याच्या शेडमध्ये चालणार्या बिंगो जुगारावर प्रवरासंगम दूरक्षेत्र विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात जुगार साहित्यासह सुमारे 22 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तर दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरुन प्रवरासंगम गावात बस स्थानकावर असणार्या पत्र्याच्या टपरीमध्ये सचिन आसाराम गायकवाड (रा. प्रवरासंगम) हा संगणकावर आकड्यावर चालणारा बिंगो नावाचा हारजीतचा जुगार खेळताना व चालविताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी सर्व साहित्य जप्त करून बिंगो जुगार चालविणारे सचिन आसाराम गायकवाड तर जुगार खेळणारा प्रकाश राजेंद्र गायकवाड यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी 1820 रुपये रोख रक्कम, दहा हजार रुपयांचा टीव्ही व दहा हजार रुपयांचा संगणक असा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय भांबे, प्रवरासंगम पोलीस दूरक्षेत्रचे पोकॉ. वसीम इनामदार, एस. एन. माने, अंबादास जाधव, रामचंद्र वैद्य यांनी केली.

अवैध व्यवसायांचे माहेरघर म्हणून प्रवरासंगमकडे पाहिले जाते. नगर-औरंगाबाद रस्त्यावरच हे गाव असल्याने बिंगो, मटका व इतर जुगार रासरोजपणे सुरू असतात. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक विजय करे यांनी कारवाई केली. मात्र इतर अवैध व्यवसायांवरही पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
