तालुकास्तरावरील पहिले ‘आरटीपीसीआर’ मशिन संगमनेरात! प्रायोगीक तत्त्वावरील राज्यातील पहिल्याच प्रयोगाचा संगमनेरकरांना होणार मोठा लाभ..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव आणि संशयीतांच्या स्राव चाचण्यांचे खोळंबणारे अहवाल यावर ‘रामबाण’ उपाय शोधण्यात आला आहे. राज्य शासनाने प्रयोगीक तत्त्वाने तालुकास्तरावर हा पहिलाच प्रयोग राबविला असून यापुढे घुलेवाडीतील ग्रामीण रुग्णालयातच ‘आरटीपीसीआर’ पद्धतीने रुग्णांची स्राव चाचणी होणार आहे. त्यासाठी शासनाकडून नवीन आरटीपीसीआर मशिनही प्राप्त झाले असून त्याचे प्रत्यक्ष संचालनही सुरु करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कचेरिया यांनी दिली. अवघ्या चार मिनिटांतच निष्कर्ष देणार्या या सुविधेमुळे अहवालाच्या प्रतिक्षेतील गंभीर रुग्णांची चाचणी करुन त्यांच्यावर तत्काळ उपचार होणार असल्याने कोविड मृत्यूचा दर शून्य करण्याच्या प्रयत्नांना त्याद्वारे बळ मिळणार असल्याचे डॉ.मंगरुळे यांनी सांगीतले. यावेळी इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम उपस्थित होते.

गेल्या दहा दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील कोविडचे संक्रमण अत्यंत गतीमान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमधील संशयीतांची ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांवर गर्दी होत आहे. जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत घेतले गेलेल स्राव नमुने जिल्हा रुग्णालयातील कोविड चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात. मात्र सध्याच्या संक्रमणाचा वेग आणि दररोज मोठ्या संख्येने समोर येणारे संशयीत यामुळे शासकीय प्रयोगशाळेतील यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला. साहजिकच त्यातून जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील अहवाल चार ते दहा दिवसांपर्यंत प्रलंबित राहु लागल्याने त्या दरम्यान उपचारांची गरज असलेल्या रुग्णांची परवड तर लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून कोविड प्रसार होवू लागला.

याबाबत दैनिक नायकने गेल्या आठवड्यात याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करुन जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे लक्ष्यही त्याकडे वेधले होते. त्याचा परिणाम त्याच्या दुसर्याच दिवशी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकार्यांशी संवाद साधून इतक्या मोठ्या प्रमाणात अहवाल का प्रलंबित राहतात याबाबत माहिती घेतली. शासकीय प्रयोगशाळेतील आरटीपीसीआर मशिनच्या मर्यादा आणि दररोज प्राप्त होणार्या स्राव नमुन्यांची संख्या यांचा ताळमेळ जुळत नसल्याची बाब जिल्हाधिकार्यांनी मंत्री थोरात यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी जिल्हा प्रयोगशाळेसाठी तत्काळ अधिक क्षमतेचे आरटीपीसीआर मशिन खरेदी करण्याचे आदेश दिले, आणि जिल्हा प्रशासनानेही त्याच दिवशी मशिन खरेदी करुन गेल्या सोमवारपासून त्याद्वारे चाचण्यांचा वेग वाढवला आहे. मात्र सध्याच्या स्थितीत प्रचंड प्रमाणात वाढलेला प्रादुर्भाव व स्राव नमुन्यांची संख्या पाहता अजूनही तालुकास्तरावरील अहवाल प्राप्त होण्यास 24 ते 48 तासांचा कालावधी लागत आहे.

या दरम्यान ज्या रुग्णांना तीव्र लक्षणे आहेत अथवा ज्याची प्रकृती नाजूक आहे अशांवर अहवालाशिवाय कोविडचे उपचार सुरु करण्यास मर्यादा होत्या. दैनिक नायकच्या वृत्तानंतर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाला गेल्या सोमवारी भेट दिली होती. त्यावेळी आरोग्य यंत्रणेनी त्यांना प्रलंबित स्राव चाचण्यांबाबत माहिती दिली होती. यासर्वांचा परिणाम आज समोर आला असून तालुकास्तरावर आरटीपीसीआर चाचण्या करणारे राज्यातील पहिलं शासकीय केंद्र संगमनेरात आजपासून कार्यान्वीत झालं आहे. त्यामुळे स्थानिक व गंभीर किंवा तत्काळ उपचारांची गरज असलेल्या रुग्णांसाठी हे मशिन अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

आज सकाळी या मशिनचे प्रत्यक्ष संचालन सुरु करण्यात आले. डॉ.प्रमोद मैड यांच्यावर या मशिनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आज दुपारच्या सत्रात या मशिनवर अवघ्या दोन तासांत तेरा जणांचा चाचण्या करण्यात आल्या. त्यातील अकरा जणांचे अहवाल निगेटिव्ह तर दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या सुविधेमुळे संगमनेरातील वाढता कोविडचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास मोठी मदत होईल असा विश्वास तहसीलदार अमोल निकम यांनी यावेळी व्यक्त केला.

आजपासून कार्यान्वीत करण्यात आलेल्या आरटीपीआर मशिनमध्ये रॅपीड द्वारा नकारात्मक चाचणी आलेल्या संशयीताच्या घशातील स्राव तपासला जाणार आहे. या मशिनद्वारा पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल अवघ्या चार मिनिटांत तर निगेटिव्ह रुग्णाचा अहवाल सतरा मिनिटांत मिळतो. एका तासांत पाच ते सहा आणि दिवसभरात सत्तर ते एैंशी चाचण्या याद्वारे होवू शकतात. त्यामुळे उपचारांची गरज आहे मात्र अहवाल नसलेल्या रुग्णांना तत्काळ उपचार देता येणार असून चाचण्यांचा वेगही आता वाढणार आहे.
डॉ.संदीप कचेरिया
वैद्यकीय अधिकारी, संगमनेर

