संगमनेर तालुक्याने ओलांडला दहा हजार रुग्णसंख्येचा टप्पा! अकोले तालुक्यात आज उच्चांकी रुग्णवाढ; अवघ्या अकरा दिवसांतच तालुक्याने ओलांडला हजारांचा टप्पा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
‘वीक एण्ड’ लॉकडाऊन असूनही राज्यासह जिल्ह्यातील कोविड संक्रमणावर त्याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसत नसून आजतर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. अवघ्या चोवीस तासांतच जिल्ह्याच्या सरासरी रुग्णगतीत तब्बल पन्नासने वाढ झाली असून आज 2 हजार 414 इतक्या उच्चांकी संख्येने रुग्ण समोर आले आहेत. राहाता तालुक्यात कोविडचा अक्षरशः उद्रेक झाला असून तालुकास्तरावर राज्यात बहुधा पहिल्यांदाच येथून तब्बल 281 तर श्रीरामपूर तालुक्यातून 243 रुग्ण समोर आले आहेत. राहुरी, कर्जत, पाथर्डी व अकोले या तालुक्यांमधील सरासरीनेही आता वेग घेतला असून या चारही तालुक्यांत गेल्या अकराच दिवसांत एक हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सर्वाधीक संक्रमण असलेल्या जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या आता पाचवरुन नऊवर गेली आहे. संगमनेर तालुक्यानेही आज दहा हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला असून सक्रीय रुग्णांची संख्याही 1 हजार 268 झाल्याने संगमनेरकरांच्या चिंता वाढल्या आहेत. तर जिल्ह्याची रुग्णसंख्याही आता 1 लाख 16 हजार 47 वर पोहोचली आहे. आज तालुक्यातील 171 रुग्णांना घरी सोडण्यात आले.
गेल्या 1 एप्रिलपासून जिल्ह्याला दररोज रुग्णसंख्येचे वाढते धक्के देणार्या कोविडने आज नवा उच्चांक केला. अर्थात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी चाचण्यांचा वेग वाढवण्यासह रुग्णाचा संपर्क शोधण्यावर अधिक भर दिल्याने जिल्ह्यातील रुग्णगतीची सरासरी वाढल्याचेही निरीक्षण समोर आले आहे. त्यातच संगमनेरातही आता आरटीपीसीआर चाचण्यांची सोय झाल्याने संगमनेर व अकोले तालुक्यातील गंभीर अथवा तत्काळ उपचारांची गरज असलेल्यांसाठी त्याचा फायदा होणार आहे. मात्र एकीकडे चाचण्यांचा वेग वाढल्याने दुसरीकडे संक्रमित रुग्ण समोर येण्याची गती वाढली आहे. त्यामुळे रोज उपचारांती घरी सोडले जाणारे रुग्ण आणि रोज नव्याने समोर येणारे रुग्ण यांच्या संख्येत मोठी तफावत निर्माण झाली असून वाढत्या सक्रीय रुग्णांच्या संख्येमुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील आरोग्य यंत्रणांवरील ताण प्रचंड वाढला आहे.
आज जिल्ह्यातील गेल्या बारा महिन्यातील कोविडचे सर्व उच्चांक मोडणारी रुग्णसंख्या समोर आली. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे सरासरीत किंचित मात्र राहाता व श्रीरामपूर तालुक्यातील सरासरीत तब्बल दहा टक्क्याहून अधिक भर पडली आहे. राहुरी, अकोले, पारनेर व कर्जत तालुक्यांच्या सरासरीला आलेला वेग चिंताजनक आहे. आत्तापर्यंत अहमदनगर पाठोपाठ राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर या तालुक्यांमध्ये संक्रमणाचा वेग अधिक होता, त्यामुळे या तालुक्यांनी अवघ्या आठच दिवसांत एक हजारांचा टप्पा ओलांडला. मात्र आता त्यात राहुरी, कर्जत, पाथर्डी व अकोले या तालुक्यांचाही समावेश झाला आहे. तालुक्यातील बहुतेक ठिकाणच्या आरोग्य सुविधा खासगी क्षेत्रावर आवलंबून आहेत. आजच्या स्थितीत जिल्ह्यांतील बहुतांशी खासगी रुग्णालये तुडूंब भरली आहेत. अशात संक्रमणाची गती वाढणं जिल्ह्याच्या स्वास्थासाठी निश्चितच पोषक ठरणार नाही.
आज शासकीय प्रयोगशाळेच्या 902, खासगी प्रयोगशाळेच्या 412 व रँपीड अँटीजेन चाचणीद्वारा 1 हजार 100 अशा एकूण 2 हजार 414 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातून 531, राहाता 281, श्रीरामपूर 243, नगर ग्रामीण 198, अकोले 171, राहुरी 154, पारनेर 137, कर्जत 135, कोपरगाव 110, भिंगार लष्करी परिसर 87, शेवगाव 71, संगमनेर 70, नेवासा 65, पाथर्डी 59, जामखेड 49, श्रीगोंदा 43, लष्करी रुग्णालय 6 व इतर जिल्ह्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे. आज उच्चांकी रुग्णांची भर पडल्याने जिल्हा आता 1 लाख 16 हजार 47 बाधितसंख्येवर पोहोचला आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्याही सुमारे तेरा हजारांच्या आसपास आहे.
आजच्या अहवालातून जिल्ह्यातील काही तालुक्यांना धक्का तर काही तालुक्यांना दिलासाही मिळाला आहे. रोज वाढती आणि उच्चांकी रुग्णसंख्या समोर येणार्या संगमनेर तालुक्याला आज मोठा दिलासा मिळाला. रोजच्या सरासरीपेक्षा आज तालुक्यात जवळपास निम्मेच रुग्ण आढळल्याने तालुक्याच्या दैनंदिन सरासरीतही मोठी घट झाली आहे. गेल्या अकरा दिवसांत तालुक्यात 1 हजार 389 रुग्ण आढळले आहेत. पहिल्या दहा दिवसांत तालुक्यांची रुग्णगती चढत्याक्रमाने 131.9 सरासरीवर गेली होती. आज मात्र तालुक्यात अवघे 70 रुग्ण समोर आल्याने सरासरीत घट होवून आज ती 126.3 पर्यंत खाली आली आहे. वाढत्या प्रादुर्भावात मिळालेला हा मोठा दिलासा आहे.
अकोले तालुक्यातील संक्रमणात राहुनराहून वाढ होत असल्याचे निरीक्षण गेल्या काहीं दिवसांतील आकडेवारीतून दिसत आहे. महिन्याच्या सुरुवातीच्या पाच दिवसांत अकोले तालुक्याच्या एकूण रुग्णसंख्येत सरासरी 52 या गतीने 261 रुग्णांची भर पडली होती. मात्र नंतर सहाच दिवसांत अपवाद वगळता तालुक्यात दररोज शंभराहून अधिक रुग्ण आढळत गेल्याने रुग्णगतीची सरासरी अडीच पटीने वाढून थेट 126.5 या गतीवर गेली, आणि तालुक्यात तब्बल 759 रुग्णांची भर पडून महिन्याच्या पहिला अकरा दिवसांतच अकोले तालुक्यातून 1 हजार 20 रुग्ण समोर आले. त्याचप्रमाणे अवघ्या चोवीस तासांत राहुरीच्या सरासरीतही मोठी वाढ झाली, कालपर्यंत राहुरीत 92.7 सरासरी होती, आज ती 98.3 वर पोहोचून तालुक्यात अकरा दिवसांत 1 हजार 81 रुग्णांची भर पडली. पाथर्डी आणि कर्जत तालुक्यातील स्थितीही या प्रमाणेच चढत्याक्रमाने तालुक्यांना एक हजार रुग्णसंख्येच्या पाल्याड घेवून गेली.
शनिवारपर्यंत अहमदनगर व राहाता तालुक्यांच्या खालोखाल संगमनेर तालुक्यातून दररोज वेगाने रुग्ण समोर येत होते. आजच्या अहवालाने गेल्या दहा दिवसांपासून अपवाद वगळता स्थिरावलेल्या जिल्ह्यातील बहुतेक स्थानांना आज हलवले. त्यात संगमनेर तालुक्याचाही समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णवाढीच्या तिसर्या स्थानावर असलेल्या संगमनेरची जागा आता श्रीरामपूर तालुक्याने घेतली आहे. संगमनेरात आजपर्यंत सरासरी 126.3 या गतीने 1 हजार 389 तर श्रीरामपूर तालुक्यातूल सरासरी 131.5 या गतीने 1 हजार 446 रुग्णांची भर पडली आहे. राहाता तालुक्यातील रुग्णवाढ चिंताजनक असून आत्तापर्यंतच्या अवघ्या अकरा दिवसांत तेथील 170.5 या गतीने 1 हजार 875 जणांना कोविडची लागण झाली आहे. आजच्या उच्चांकी रुग्णवाढीने राहाता तालुक्याची सरासरी तब्बल अकरा टक्क्यांनी उसळली आहे.