संगमनेरात तीन आठवड्यांचा ‘कडकडीत लॉकडाऊन’? तालुक्यातील सक्रीय रुग्णांची संख्या साडेबाराशेच्या घरात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील कोविडची स्थिती अतिशय गंभिर होत असल्याने राज्य मंत्री मंडळाकडून राज्यात दोन किंवा तीन आठवड्यांचा कडकडीत ‘लॉकडाऊन’ घोषीत होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईतही तशा हालचाली सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सायंकाळी सर्वपक्षीय नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आज सकाळी संगमनेरात आढावा बैठक घेवून तालुक्यातील कोविडस्थिती आणि उपाययोजनांची माहिती घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी ‘गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये सामान्य माणसांसह छोट्या व्यापार्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले, मात्र मानवतेसाठी, त्यांचे जीव वाचवण्यासाठी कटू असले तरीही असे निर्णय घ्यावे लागतील’ असे सांगत त्यांनी राज्यात लवकरच ‘कडकडीत लॉकडाऊन’ची घोषणा होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

राज्यातील कोविडची स्थिती दिवसोंदिवस अतिशय चिंताजनक होत आहे. राज्यात सर्वाधीक प्रादुर्भाव होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये अहमदनगरचाही समावेश आहे. त्यातही जिल्ह्यातील अहमदनगर, राहाता, संगमनेर, कोपरगाव व श्रीरामपूर या तालुक्यांची अवस्था अत्यंत बिकट असून अहमदनगर महापालिका क्षेत्रात सरासरी दररोज साडेपाचशेहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. राहाता तालुक्यातून सरासरी 159 तर संगमनेर तालुक्यातून तब्बल 132 रुग्ण रोज इतकी गतीमान सरासरी आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये कोविड असाच भरात होता. त्या एकाच महिन्यात गेल्या वर्षीचा उच्चांक ठरलेली 1 हजार 529 रुग्णसंख्या समोर आली होती. त्यावेळी सरासरी रोजची रुग्णगती केवळ 51 होती, आज ती थेट 132 वर गेली आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांची स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. यावरुन राज्यातील सध्याची अवस्था अत्यंत चिंताजनक असल्याचे दिसून येते.

गेल्या सोमवारपासून राज्यात ‘कठोर निर्बंध’ लावण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू आहे. याशिवाय औद्योगिक क्षेत्र वगळता 30 एप्रिलपर्यंत राज्यात हे निर्बंध लागू आहेत. राज्य शासनाच्या आदेशाने निर्बंध लागू होवूनही ना राज्याच्या रुग्णगतीत कोणता फरक पडला, ना जिल्ह्याच्या आणि ना तालुक्याच्या. गेल्या दहा दिवसांचा विचार करता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागण्यापूर्वीच्या 1 ते 5 एप्रिल या पहिल्या पाच दिवसांत जिल्ह्यात दररोज सरासरी 1 हजार 715 रुग्ण या गतीने 8 हजार 574 तर संगमनेर तालुक्यात दररोज सरासरी शंभर रुग्ण या गतीने पाचशे रुग्णांची वाढ झाली. त्यानंतर राज्यासह जिल्ह्यात कठोर निर्बंध लागले. मात्र त्याचा कोणताही परिणाम रुग्णगतीवर झाल्याचे गेल्या पाच दिवसांत दिसून आले नाही.

6 एप्रिलनंतर अपवाद वगळता जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत रोज दोन हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली. विशेष म्हणजे या काळात केवळ किराणा मालाची दुकाने, औषधालये, दुध व अन्य जीवनावश्यक व शेतीपुरक व्यवसाय सुरु होते. तरीही रुग्णगतीने आश्चर्यकारकरित्या उसळी घेतली. पहिल्या पाच दिवसांच्या सरासरीच्या तुलनेत नंतरच्या पाच दिवसात जिल्ह्याची रोजची सरासरी 2 हजार 27 वर जावून जिल्ह्यात 10 हजार 137 रुग्णांची वाढ झाली. तर संगमनेर तालुक्याच्या सरासरीतही जवळपास दुप्पट वाढ होवून रोज 164 रुग्ण या गतीने तब्बल 819 रुग्णांची भर पडली. रुग्णवाढीच्या वाढत्या सरासरीवरुन कोविडचा नवा विषाणू किती भयंकर गतीने पसरतोय याचा सहज अंदाज येतो. असेच सुरु राहीले तर येत्या काही दिवसांत आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भिती निर्माण झाल्याने राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावाच लागणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

महसुल मंत्री बाळासहेब थोरात यांनी मुंबईला रवाना होण्यापूर्वी आज प्रशासकीय भवनात अधिकार्यांची आढावा बैठक बोलावली. यावेळी त्यांनी संगमनेरच्या आरोग्य स्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली. घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सुविधा, प्राधान्यक्रमाने आवश्यकता आदींची माहिती घेतल्यानंतर त्यांनी आमदार निधीतील अखर्चित 30 लाख रुपयांचा निधी आरोग्य सेवा सुधारणांसाठी लवकरात लवकर वापरण्याच्या सूचना दिल्या. रेमडेसिवीर लशीच्या तुटवड्याबाबत त्यांनी सदरची लस कोणत्या टप्प्यावरील रुग्णांना वापरावी याबाबत नेमके निकष ठरलेले नसल्याने त्याचा सर्रास वापर होत असल्याकडे पत्रकारांचे लक्ष वेधले. त्यासाठी लवकरच नियमावली समोर येईल असेही ते म्हणाले. जिल्ह्याचीच नव्हेतर राज्यातील कोविड स्थिती गंभिर वळणावर आहे, सरकार या संकटाचा सामना करीत आहे. लोकांना आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे, लोकांचे जीव वाचले पाहिजे याला सरकारचा प्राधान्यक्रम आहे. त्या अनुषंगाने काही कटू निर्णय घ्यावे लागतील असे सांगतांना त्यांनी राज्यात लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना एकप्रकारे पाठबळच दिले.

