श्रीरामपूर तालुका पोलिसांनी मोटारसायकल चोरणारी टोळी पकडली वरवंडी येथून तिघांना पोलिसांनी केली अटक; एक दुचाकी हस्तगत

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील हरेगाव मतमाऊली यात्रेतून आणि आठवडे बाजारातून मोटारसायकल चोरणारी टोळी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी जेरबंद केली आहे. याप्रकरणी राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 50 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल हस्तगत केली आहे.

अकोला जिल्ह्यातील तेलोरा तालुक्यातील अडगाव येथील अमर गोलाराम घोसले (वय 32) यांचे मालकीची 50 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच.30, बीक्यू.7050) ही हरेगाव मतमाऊली यात्रा येथून अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. याबाबत श्रीरामपूर तालुका पोेलिसांत 320/2022, भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राहुरी तालुक्यातील वरवंडे गावात आनंद संजय पवार व त्याचे साथीदार हे यात्रा, आठवडे बाजार याठिकाणाहून मोटारसायकल चोरुन त्यांची विक्री करतात.

या माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांच्या मदतीने आनंद संजय पवार याचेकडे चौकशी करुन त्याला हरेगाव येथील मतमाऊली यात्रेतून चोरीस गेलेल्या मोटारसायकलबाबत विचारणा केली असता त्याने त्याचे साथीदार ताराचंद काशिनाथ भालेराव, चैतन्य संजय शिंदे यांचे मदतीने हरेगाव मतमाऊली यात्रेतून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिल्याने ताराचंद काशिनाथ भालेराव, चैतन्य संजय शिंदे यांना वरंवडी (ता. राहुरी) येथून ताब्यात घेवून तीनही आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आर. व्ही. शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. डी. लंवाडे, पोलीस नाईक ए. डी. पवार, पोलीस कॉन्स्टेबल एस. ए. कराळे यांनी केली आहे.
