दोन दिवसात संगमनेर तालुक्यातील पाच तरुणांचा अपघाती मृत्यू! अपघातांची श्रृंखला; चंदनापुरी व मिर्झापूर येथील तरुणांचा अपघाती बळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

संगमनेर तालुक्यात सुरु झालेली अपघातांची श्रृंखला कायम असून आजही तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघा तरुणांचा बळी गेला आहे. यातील पहिल्या घटनेत रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या कडेला धडक बसल्याने दुचाकीवरुन उडून पाण्यात पडल्याने 26 वर्षीय तरुणाचा तर, दुसऱ्या घटनेत पाण्याचा कॉक सुरु करण्यासाठी गेलेल्या अवघ्या एकोणावीस वर्षीय कोवळ्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला, हा तरुण एकुलता एक होता. या घटनेने अवघ्या दोन दिवसांतच तालुक्यातील पाच तरुणांचा बळी गेला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अपघाताची पहिली घटना आज (ता.19) पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील चंदनापुरी येथे घडली. चंदनापुरीत राहणारा रवींद्र शिवाजी रहाणे हा 26 वर्षीय तरुण आपल्या दुचाकीवरुन घरी जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या कठड्याला त्याच्या वाहनाची धडक बसली. त्यामुळे सदरील तरुण दुचाकीवरुन उडून विहिरीत पडला व पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण चंदनापुरी पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. मयत रवींद्र राहणे हा एका लग्न सोहळ्याला उपस्थित राहून घरी निघाला होता. मात्र घरी पोहोचण्यापूर्वीच त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
तर, दुसरी अतिशय दुर्दैवी घटना तालुक्यातील मिर्झापूर येथून समोर आली आहे. अत्यंत वेदनादायी या घटनेत अवघ्या एकोणावीस वर्षाच्या ऋषिकेश राधाकिसन वलवे या कोवळ्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ऋषिकेशच्या वडिलांनी पाण्याचा कॉक सुरु करण्यासाठी त्याला शेततळ्यावर पाठवले होते. मात्र कॉक सुरु करताना त्याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात घसरत गेला व पाण्यात पडला. त्याचा आरडाओरडा त्याच्या वडिलांच्या कानापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यातच शेततळ्यातून बाहेर पडण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याने दमछाक झालेला ऋषिकेश पाण्यात बुडून मयत झाला, तो एकुलता एक आहे. अतिशय शोकाकुल वातावरणात त्याच्यावर मिर्झापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मनं सून्न करणाऱ्या या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
24 तासापूर्वी तालुक्यातील चिखली येथील चौघे तरुण अशाच प्रकारे लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी समनापुरकडे निघाले होते. मात्र काळाने त्यांना संगमनेरातूनच माघारी बोलवलं. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून गप्पा मारीत चाललेल्या या चौघा मित्रांना माहितही नव्हते की काळ जबडा वासून त्यांची प्रतीक्षा करीत आहे. त्यांचा बळी घेण्यासाठी काळाने रचलेल्या सापळ्यानुसार त्यांच्या दुचाकी मंगळापुर शिवारातील बर्फ कारखान्याजवळ येताच समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या प्रभात दूध डेअरीच्या टँकरने धडक दिल्याने त्यातील ऋषिकेश उमाजी हासे (वय 20), सुयोग बाळासाहेब हासे  (वय 20) व नीलेश बाळासाहेब सिनारे (वय 26) या तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर संदीप भाऊसाहेब केरे हा 32 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. या भीषण अपघातात एकाच वेळी तिघा तरुणांच्या मृत्यूने धक्का बसलेला तालुका त्यातून सावरण्यापूर्वीच आज सकाळी या दोन दुर्दैवी घटना समोर आल्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *