डंपरची दुधाच्या टेम्पोला धडक; महामार्गावर दुधाचा सडा
![]()
नायक वृत्तसेवा, घारगाव
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कर्जुले पठार येथील उड्डाणपुलावर मालवाहू डंपरने दुधाच्या टेम्पोला जोराची धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात टेम्पोमधील दुधाच्या पिशव्या महामार्गावर पडल्या होत्या, तर दोन्ही वाहने पलटी झाली होती. हा अपघात शुक्रवारी (ता.26) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास झाला असून काही वेळ वाहतुकही ठप्प झाली होती.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दुधाचा टेम्पो हा संगमनेरकडून पुणेच्या दिशेने जात होता. शुक्रवारी रात्री पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कर्जुले पठार येथील उड्डाणपुलावर आला असता त्याचवेळी मागून येणार्या मालवाहू डंपरने जोराची धडक दिली. यामुळे दोन्ही वाहने महामार्गावर पलटी झाली, तर दुधाच्या टेम्पोमधील दुधाचे कॅरेट हे सर्व विखुरलेल्या अवस्थेत महामार्गावर पडल्याने मोठ्या प्रमाणात दुधाचे नुकसान झाले आणि डंपरमधील राखही महामार्गावर पडली होती. या अपघातामुळे काही वेळ वाहतूकही ठप्प झाली होती. घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ दिवटे, रमेश शिंदे, योगीराज सोनवणे, नंदू बर्डे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
