सर्वसामान्य माणसाचे जगणे सुकर होईल असे धोरण आणावे ः सोनू सूद साईबाबांच्या दर्शनानंतर नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली अपेक्षा व्यक्त

नायक वृत्तसेवा, शिर्डी
अभिनेता सोनू सूद याने करोना काळात गोरगरीब आणि मजुरांना केलेल्या मदतीमुळे तो सामाजिक कार्यात देखील प्रकाशझोतात आला आहे. अनेक चित्रपटात सोनू खलनायकाची भूमिका बजावत असला तरी खर्या आयुष्यात अनेकांना मदतीचा हात देऊन तो त्यांच्यासाठी नायक ठरला आहे. सोनू सूद हा साईभक्त असून तो अनेकदा साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतो. शुक्रवारी (ता.1) दुपारी देखील सोनू सूद याने साई समाधीचे दर्शन घेतले. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात असे धोरण आणावे की, ज्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे सुकर होईल, अशी अपेक्षाही सूद याने यावेळी व्यक्त केली.

एक महिन्यापूर्वी देखील तो शिर्डीत आला होता. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी त्याला पुन्हा शिर्डीत येण्याचे प्रयोजन विचारले असता त्याने स्पष्टीकरण दिले आहे. सोनू सूद म्हणाला की, शिर्डीमध्ये मोठे सामाजिक काम सुरू करण्याचा त्याचा मानस आहे. शिर्डी येथे अनाथआश्रम, वृद्धाश्रम तसेच शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिर्डीतील त्याच्या सहकार्यांच्या मदतीने पुढील काही महिन्यातच या आश्रमाचे काम सुरू करण्यासाठी सोनू सूद शिर्डीजवळ जमीन खरेदी करत आहे. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता आणि शासकीय परवानग्या मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सोनू सूद याच्या शिर्डी वार्या वाढल्या असून या आश्रमाच्या माध्यमातून शिर्डी परिसरात देश पातळीवरील सामाजिक काम उभे करण्यासाठी त्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचे हे प्रयत्न लवकरात लवकर तडीस जावेत यासाठी साई चरणी प्रार्थना केल्याचे सूद याने सांगितले.

साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्याने राज्यातील नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या. मात्र, या सरकारकडून एक अपेक्षाही बोलून दाखविली. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात असे धोरण आणावे की, ज्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे सुकर होईल, अशी अपेक्षा सूद याने व्यक्त केली. तसेच एक कलाकार म्हणून मी इमानदारीने काम करतो. ज्यांनी सिनेमा बघितला त्यांना पृथ्वीराजमधील माझी भूमिका आवडली. मात्र सिनेमा चालणे किंवा न चालणे हे आपल्या हातात नसते. लोकांच्या मनोरंजनासाठी आम्ही सिनेमा बनवतो आणि भविष्यातही बनवत राहू असे माध्यमांशी बोलताना सोनू सूद म्हणाला.

उदयपूरमधील कन्हैय्यालालच्या हत्येच्या घटनेवरही त्याने भाष्य केले. तो म्हणाला, हत्या ही अत्यंत दुखद आणि दुर्दैवी आहे. देशात सध्या जे काही चालले आहे ते योग्य नाही. हिंदू आणि मुस्लीम एकमेकांचे बांधव आहेत. सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे. मानवतेपेक्षा श्रेष्ठ कोणताही धर्म नाही. त्यामुळे धर्माचा विचार न करता एकमेकांना मदत करणे अपेक्षित आहे. हाच साईबाबांचा संदेश देशभर जाणे गरजेच आहे, असंही सोनू म्हणाला.
